भरधाव कार पुलाच्या खांबावर आदळली : पती ठार, पत्नी-दोन मुले व बहीण गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : देवरी-आमगाव मार्गावरील डोंगरगाव सोनारटोला जवळ गुरुवारी (२२) मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव कार पुलाच्या खांबावर धडकल्याने पतीचा मृत्यू झाला, तर पत्नी, दोन मुले आणि बहीण असे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात अशोक सत्यनारायण मोदी (वय ५५, रा. आमगाव) यांचा मृत्यू झाला आहे.
अपघातात जखमी झालेल्यांमध्ये सीमा अशोक मोदी (वय ५०), मुलगा आयुष अशोक मोदी (वय २९), मुलगी मुस्कान अशोक मोदी (वय २५) आणि बहीण दीपा नितीन अग्रवाल यांचा समावेश आहे. सर्व जखमींवर सध्या गोंदिया येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राप्त माहितीनुसार, अशोक मोदी हे गुरुवारी रात्री कुटुंबासह रायपूरहून कारने आमगावकडे परतत होते. मध्यरात्री सुमारे दीड वाजताच्या सुमारास देवरी-आमगाव मार्गावरील डोंगरगावजवळ सोनारटोला पुलावर कारवरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट पुलाच्या खांबावर आदळले. या जोरदार धडकेत कारमधील सर्वच प्रवासी गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर जखमींना तातडीने देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान अशोक मोदी यांचा मृत्यू झाला. इतर चार जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी गोंदिया येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, अशोक मोदी व त्यांचे कुटुंबीय हे मुलाच्या विवाह सोहळ्याच्या तयारी व खरेदीसाठी रायपूरला गेले होते. आनंदाच्या तयारीसाठी गेलेला हा प्रवास काळाने घात ठरला असून, या दुर्घटनेमुळे मोदी कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अपघाताची माहिती मिळताच आमगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
News - Gondia




Petrol Price




