महत्वाच्या बातम्या

 राज्यात १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समिती निवडणुका ५ फेब्रुवारीला


विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत अधिकृत घोषणा केली. या निवडणुकांतर्गत राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राज्यातील ग्रामीण राजकारणाला वेग आला आहे.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी १६ जानेवारी २०२६ रोजी अधिसूचनेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून १६ जानेवारी ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. २७ जानेवारी २०२६ ही उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख असून, त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजेपर्यंत अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करून निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.

मतदान व मतमोजणी -
या निवडणुकांसाठी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ६.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. निवडणूक प्रचाराची सांगता मतदानाच्या २४ तास आधी करण्यात येणार आहे.

मतदार यादी व मतदान व्यवस्था -
या निवडणुकांसाठी १ जुलै रोजीची मतदार यादी वापरण्यात येणार आहे. राज्यभरात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी २५ हजार ४८२ मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. तसेच मतदानासाठी १ लाख १० हजार ३२९ बॅलेट युनिट्सचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.

कोणकोणत्या जिल्ह्यांत निवडणुका?
कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदांसाठी निवडणूक होणार आहे. त्याचप्रमाणे पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर आणि धाराशिव या जिल्हा परिषदांसाठीही निवडणुका घेण्यात येणार आहेत. संबंधित जिल्ह्यांतील पंचायत समित्यांसाठीही एकाच टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.

ग्रामीण विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या निवडणुकांकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून, आगामी काळात ग्रामीण भागात प्रचाराची धामधूम वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos