नागपूर शहरातील रस्ते अपघातात घट : परिवहन विभागाच्या उपायोजनांना यश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : सन २०२४ च्या तुलनेत सन २०२५ मध्ये नागपूर शहरातील रस्ते अपघातात ७ टक्के व रस्ते अपघातातील मृत्युदरात २१ टक्के घट झाली असून ही बाब नागपूर शहरातील नागरिकांना दिलासा देणारी आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर (शहर) यांच्याव्दारे नागपूर शहरात संपूर्ण वर्षभर रस्ता सुरक्षेचे अनेक उपक्रम राबविण्यात आले. त्यांना यश प्राप्त झाले आहे.
सन २०२४ मध्ये जानेवारी ते नोव्हेंबर, २०२४ या कालावधीत नागपूर शहरात एकूण ११४३ रस्ते अपघातात ३१६ व्यक्तींचा मृत्यु झाला होता व ११६५ व्यक्ती जखमी झाल्या होत्या. तर सन २०२५ मध्ये जानेवारी ते नोव्हेंबर, २०२५ या कालावधीत एकूण १९५९ रस्ते अपघातात २५० व्यक्तींचा मृत्यु झाला असून १०४५ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. म्हणजेच सन २०२४ च्या तुलनेत सन २०२५ मध्ये नागपूर शहरातील रस्ते अपघातात ७ टक्के, अपघाती मृत्युमध्ये २१ टक्के आणि जखमींच्या संख्येत १० टक्के घट झाली आहे. संपूर्ण राज्यात अपघाती मृत्यु कमी करण्यात नागपूर शहर प्रथम स्थानावर आहे.
रस्ते अपघाताची कारणे व अपघात टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत नागपूर शहरातील अनेक शाळा व महाविद्यालये येथे कार्यशाळा घेण्यात आल्या, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, प्रेरणा इंटरनॅशनल स्कूल, सर्वश्री प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, तिडके ज्युनिअर कॉलेज, व्ही.पी.ए. क्लासेस, ए.बी.सी. कॉन्व्हेंट, आय. सी. आय. सी. आय. अॅकॅडमी, एन.सी.सी कॅम्प, एअरफोर्स स्टेशन सोनेगाव व वायुसेना नगर यासह नागपूर शहरातील अनेक संस्थांमध्ये या कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षक यांनी रस्ते वाहतुकीचे नियम व वाहतुक चिन्हे याबाबत मार्गदर्शन केले.
खाजगी बस तपासणी मोहिम, स्कूल बस तपासणी मोहिम, रुग्णवाहीका तपासणी मोहिम, ई-रिक्षा व रिक्षा तपासणी मोहिम अशा विविध मोहिमा राबविण्यात आल्या. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १०३७९ वाहनांवर मोटार वाहन कायदयातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येवून ५ कोटी ७९ लक्ष ९० हजार रुपये तडजोड शुल्क (दंड) वसूल करण्यात आले आहे. स्कूल बस तपासणी मोहिमेत माहे एप्रिल, २०२५ ते नाव्हे, २०२५ या कालावधीत ३३७ दोषी स्कूल बसेस विरुध्द कारवाई करुन ४३.८४ लक्ष रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे.
हेल्मेट वापराविषयी जनजागृती करण्यासाठी हेल्मेट रॅली, रिक्षा चालकांना फर्स्ट एड किटचे वाटप, वाहतुकीची पाठशाळा या पुस्तिकेचे शाळा व महाविद्यालयात वितरण, रक्तदान शिबीर, वॉकेथॉन, स्कूल बस चालकांचे समुपदेशन इत्यादी उपक्रम राबविण्यात आले. मद्यप्राशन करुन वाहन चालविणे, वाहन चालवितांना मोबाईलचा वापर करणे, सिग्नल तोडणे, क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे इत्यादी विविध गुन्हयांसाठी २८५ ड्रायव्हींग लायसन्स निलंबित करण्यात आले आहेत.
परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक तुषारी बोबडे, सतिश नवघरे, पवन बानबाकडे, विशाल भोवते तसेच सहायक मोटार वाहन निरक्षक राहूल वंजारी, ओंकार मेश्राम, जयंत कारेमोरे इत्यादींनी विविध तपासणी मोहिमा यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
News - Nagpur




Petrol Price




