कर्ज मंजुरीच्या नावाखाली ११ लाखांची फसवणूक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : खासगी वित्तसंस्थेत कार्यरत असलेल्या सीमा होवाळ (वय ४९) यांची कर्ज मंजुरीच्या बहाण्याने तब्बल ११ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. तोतया बँक व्यवस्थापक व एजंटांनी संगनमताने हा प्रकार केल्याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी १९ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.
होवाळ या अंधेरी येथील अर्बन फायनान्स प्रा. लि. या संस्थेत कार्यरत असून, शासकीय व खासगी बँकांमधून कर्ज मंजुरीसाठी फाईल तयार करण्याचे काम करतात. कामाच्या निमित्ताने त्यांची ओळख एजंट हिमांशू सावला व अभिजित यांच्यामार्फत संजय पांडे याच्याशी झाली. पांडेने आपण कॅनरा बँक (बीकेसी) व आयसीआयसीआय बँकेतील अधिकाऱ्यांशी जवळीक असल्याचा दावा करत मोठ्या रकमेची कर्जे मंजूर करून देतो, असे भासवले.
दरम्यान, सप्टेंबर २०२५ मध्ये एजंट प्रभाकर मिश्रा याने त्यांचा मालक असलेले बांधकाम व्यावसायिक संजय मिश्रा यांना सुमारे १०० कोटी रुपयांच्या कर्जाची आवश्यकता असल्याचे होवाळ यांना सांगितले. त्यानंतर पांडेने कॅनरा बँकेकडून १०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे बनावट पत्र व्हॉट्सॲपवर पाठवले. तसेच कर्जासाठी १० टक्के रक्कम भरण्याची अट घातली.
मात्र, एवढी मोठी रक्कम भरणे शक्य नसल्याचे संजय मिश्रा यांनी सांगितल्यानंतर पांडेने पर्याय शोधण्याचे आश्वासन दिले. पुढे मुंबईत येण्यासाठी त्याने विमान तिकीट मागितले. त्यानुसार २ डिसेंबर रोजी लखनौ–मुंबईचे तिकीट बुक करण्यात आले. मुंबईत आल्यानंतर कायदेशीर खर्चाच्या नावाखाली त्याने ६० हजार रुपयांची मागणी केली. यासह विविध कारणे पुढे करत आरोपींनी होवाळ यांच्याकडून एकूण ११ लाख रुपये उकळले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच होवाळ यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी संबंधित एजंट व तोतया बँक अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
News - World




Petrol Price




