बुटीबोरी एमआयडीसीत पाण्याची टाकी फुटून सात कामगारांचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : बुटीबोरी एमआयडीसी परिसरातील अवाडा कंपनीच्या आवारात शुक्रवारी सकाळी भीषण दुर्घटना घडली. १५ लाख लिटर पाणी साठवणूक क्षमतेच्या टाकीतील पाण्याचे टेस्टिंग सुरू असतानाच अचानक टाकी फुटली. या घटनेत सात कामगारांचा मृत्यू झाला असून दहा कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांच्यावर नागपुरातील एम्स व मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी सकाळी सुमारे ११.३० वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. टाकी फुटल्यानंतर निर्माण झालेल्या पाण्याच्या प्रचंड दाबामुळे आणि लोखंडी पत्र्यांचा जोरदार फटका बसल्याने जवळच काम करीत असलेल्या तीन कामगारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. उर्वरित चौघे गंभीर जखमी झाले होते; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांमध्ये सुधांशू नागेश्वर साहनी (३०, रा. मुजफ्फरपूर, बिहार), बुलेटकुमार इंद्रजीत सहा (३०, रा. मिश्रोली, सुहानी, पश्चिम चंपारण, बिहार), शमीम हसमत अन्सारी (२८, रा. भागवत पारसा, गोपालगंज, बिहार), अरविंदकुमार ठाकूर (२८, रा. चंपारण, बिहार), अशोक कंचन पटेल (४२, रा. पहाडपूर, बिहार) आणि अजय राजेश्वर पासवान (२६, रा. मुजफ्फरपूर, बिहार) यांचा समावेश आहे. एका मृत कामगाराचे नाव अद्याप कळू शकलेले नाही.
अवाडा कंपनीत सोलार सेल तयार केले जातात. या प्रक्रियेसाठी अत्यंत शुद्ध पाण्याचा वापर केला जातो. त्यासाठी पाण्याच्या तीन वेगवेगळ्या चाचण्या केल्या जातात. यापैकी कोणती तरी चाचणी सुरू असतानाच टाकी फुटल्याने हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमी कामगारांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेने औद्योगिक परिसरात खळबळ उडाली असून घटनेच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
News - Nagpur




Petrol Price




