साक्षगंधाच्या कार्यक्रमात गोळीबार : एक गंभीर, सात जण ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : साक्षगंधाच्या कार्यक्रमात पाहुण्यांचे जेवण सुरू असताना अचानक पाच ते सहा जणांनी हातात चाकू घेऊन एका पाहुण्याला घेरत मारहाण सुरू केली आणि या वादाचे रूपांतर थेट गोळीबारात झाले. देशीकट्ट्यातून झाडलेल्या दोन गोळ्या छाती व मांडीत घुसल्याने बाल्या हिरामण गुजर (रा. कुही) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
रविवारी (२३) दुपारी ३ वाजताच्या सुमारास मोटपानजीकच्च्या शंकरपट (ता. कळमेश्वर) येथे साक्षगंधाचा कार्यक्रम सुरू होता. बाल्या पाहुणा म्हणून उपस्थित होता. या वेळी देवा ऊर्फ परमेश्वर पिसाराम एकनाथ यासह त्याचे भाऊ – तपन, आकाश, मोरेश्वर तसेच सावन काशीराम एकनाथ, काशीराम बाबूराव एकनाथ आणि दिनेश सनेश्वर (सर्व रा. सेलू) हेही कार्यक्रमात आले होते.
देवा आणि बाल्या यांच्यात काही दिवसांपासून व्यवहारासंबंधी वाद सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. कार्यक्रम आटोपल्यानंतर जेवण चालू असताना देवासह त्याच्या साथिदारांनी बाल्याला बोलावून त्याला घेराव घातला. वाद चिघळताच काही आरोपींनी चाकू काढले, तर देवाने सोबत आणलेल्या देशीकट्ट्यातून सलग दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी छातीत आणि दुसरी मांडीत लागल्याने बाल्या रक्तबंबाळ अवस्थेत कोसळला. त्याला तातडीने नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे.
गोळीबारानंतर निर्माण झालेल्या गोंधळात काही पाहुण्यांना किरकोळ दुखापत झाली. माहिती मिळताच कळमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व पंचनामा केला. काही तासांतच सातही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.
देवा ऊर्फ परमेश्वर हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून त्याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. अन्य आरोपींच्या अटकेची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. गावात या प्रकारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास कळमेश्वर पोलिस करीत आहेत.
News - Nagpur




Petrol Price




