स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अल्टिमेटम


- सात दिवसांत निर्णय घ्या : अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा तालुक्यांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसने तीव्र विरोध दर्शविला आहे. स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तातडीने थांबवून जुन्या मीटरची नियमित रीडिंग घ्यावी आणि त्याच आधारे वीजबिल आकारण्यात यावे, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री आत्राम यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या आलापल्ली येथील कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या वीजबिलात वाढ होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला असून, या निर्णयाचा सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार पडत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
दुर्गम भागातील नागरिकांच्या अडचणींचा मुद्दा -
अहेरी विधानसभा क्षेत्रातील बहुतांश भाग दुर्गम आणि जंगलव्याप्त आहे. अनेक गावांमध्ये अद्यापही मोबाईल नेटवर्कची पुरेशी सुविधा उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत स्मार्ट मीटरच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने वीजबिलाची माहिती मिळणे तसेच ऑनलाइन बिल भरण्याची प्रक्रिया नागरिकांसाठी अडचणीची ठरू शकते, असा मुद्दा निवेदनात मांडण्यात आला आहे.
विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना डिजिटल सुविधांचा अभाव असल्याने स्मार्ट मीटरची सक्ती करण्यापूर्वी स्थानिक परिस्थितीचा विचार करणे आवश्यक असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने म्हटले आहे. जुन्या मीटरची प्रत्यक्ष रीडिंग घेऊन त्यानुसार वीजबिल आकारण्याची पद्धत सुरू ठेवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
आमदारांच्या पत्रानंतरही कार्यवाही नसल्याचा आरोप -
स्मार्ट मीटरच्या प्रश्नावर यापूर्वी अहेरीचे आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनीही ३१ मार्च २०२६ रोजी संबंधित विभागाला पत्र देऊन नागरिकांच्या समस्या मांडल्या होत्या. मात्र, त्यानंतरही स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू असल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या मागणीकडे गांभीर्याने पाहून महावितरणने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. स्मार्ट मीटर बसविण्याबाबत तसेच जुन्या मीटरची नियमित रीडिंग घेऊन त्याच आधारे वीजबिल आकारण्याबाबत सात दिवसांच्या आत ठोस निर्णय घ्यावा, असा अल्टिमेटम निवेदनातून देण्यात आला आहे.
निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा -
सात दिवसांच्या मुदतीत महावितरणकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे स्मार्ट मीटरचा मुद्दा आता अहेरी विधानसभा क्षेत्रात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. दुर्गम भागातील नागरिकांच्या अडचणी, वीजबिलातील वाढीच्या तक्रारी आणि डिजिटल सुविधांचा अभाव या बाबींचा विचार करून महावितरणने स्मार्ट मीटरबाबत फेरविचार करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे.




Petrol Price




