महत्वाच्या बातम्या

 अंदमानमधील बॅरन बेटावरील ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक : आठ दिवसांत दोन स्फोट


विदर्भ न्युज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / पोर्ट ब्लेअर : भारताचा एकमेव सक्रिय ज्वालामुखी असलेल्या अंदमान-निकोबारमधील बॅरन बेटावर पुन्हा उद्रेक झाल्याची नोंद झाली आहे. १३ आणि २० सप्टेंबर रोजी या बेटावर दोन सौम्य स्फोट झाले. या स्फोटांमुळे कोणतीही मोठी हानी झाली नसली, तरी परिसरात ४.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. भारतीय नौदलाने या उद्रेकाचे व्हिडीओ रेकॉर्ड करून प्रसिद्ध केले आहेत.

अंदमान समुद्रात वसलेले बॅरन बेट पोर्ट ब्लेअरपासून तब्बल १४० किलोमीटर अंतरावर आहे. हे बेट संपूर्णपणे ज्वालामुखीने तयार झालेले असून येथे मानवी वस्ती नाही. समुद्रसपाटीपासून ३५४ मीटर उंचीवर असलेला हा ज्वालामुखी इंडियन आणि बर्मा टेक्टॉनिक प्लेट्सच्या टक्करमुळे निर्माण झाला आहे. भूवैज्ञानिकांसाठी हे बेट महत्त्वाचे संशोधनकेंद्र मानले जाते.

१३ सप्टेंबरला झालेल्या पहिल्या स्फोटातून धूर व राख बाहेर पडली, तर २० सप्टेंबरच्या दुसऱ्या स्फोटात लाव्हाचा प्रवाहही दिसून आला. हे दोन्ही स्फोट ‘स्ट्रॉम्बोलियन’ प्रकारातील असून, हे सौम्य पण वारंवार होणारे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.या ज्वालामुखीचा पहिला उद्रेक १७८९ मध्ये नोंदवला गेला होता. १९९१ मध्ये झालेल्या मोठ्या उद्रेकात लाव्हा मोठ्या प्रमाणावर वाहिला होता. त्यानंतर २०१७ आणि २०१८ मध्येही हा ज्वालामुखी सक्रिय झाल्याची नोंद आहे.

सध्या तरी या उद्रेकामुळे कोणताही मोठा धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, राखेचे प्रमाण वाढल्यास सागरी जीवसृष्टी व प्रवाळ बेटांना धोका निर्माण होऊ शकतो. त्याचप्रमाणे हवाई वाहतुकीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि नौदल या बेटावर सतत लक्ष ठेवून असून, परिस्थिती तीव्र झाली तर तातडीने इशारा जारी केला जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.





  Print






News - World




Related Photos