महत्वाच्या बातम्या

 केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबाचा कहर : ६९ रुग्ण, १८ जणांचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / केरळ : केरळमध्ये पुन्हा एकदा मेंदू खाणाऱ्या अमिबाचा (Naegleria fowleri) कहर दिसून येत आहे. यावर्षी आतापर्यंत राज्यात ६९ प्रकरणांची नोंद झाली असून त्यापैकी १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. हा अमिबा जितका भीतीदायक वाटतो तितकाच प्राणघातक ठरू शकतो. त्यामुळे या आजाराबाबतची माहिती जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे.

मेंदू खाणारा अमिबा म्हणजे काय?
या अमिबाचे शास्त्रीय नाव Naegleria fowleri आहे.
तो प्रामुख्याने तलाव, नद्या, गरम पाण्याचे झरे तसेच योग्य काळजी न घेतलेल्या **स्विमिंग पूलमध्ये** आढळतो.

उष्ण हवामानामध्ये याची वाढ जलद होते.
या अमिबामुळे प्रायमरी एमीबिक मेनिनजोएन्सेफलाइटिस (PAM) नावाचा संसर्ग होतो, जो थेट मेंदूवर हल्ला करतो.
एकदा हा अमिबा मेंदूपर्यंत पोहोचला की, तो मेंदूच्या ऊतींना (टिश्यू) नष्ट करतो. त्यामुळे त्याला मेंदू खाणारा अमिबा असं नाव पडलं आहे.

संसर्गाची लक्षणं -
हा संसर्ग सामान्यतः पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर १ ते ९ दिवसांनी दिसून येतो. सुरुवातीला ही लक्षणं इतर साध्या व्हायरल इन्फेक्शनसारखी भासत असल्याने ओळखणं कठीण होतं. पण नंतर लक्षणं अतिशय वेगाने गंभीर बनतात.

सुरुवातीची लक्षणं (१ ते ५ दिवसांत)
तीव्र डोकेदुखी
ताप येणे
मळमळ व उलट्या
अशक्तपणा व थकवा
पुढील गंभीर लक्षणं (५ व्या दिवसानंतर)

आकडी येणं -
गोंधळून जाणं किंवा मानसिक अस्वस्थता
लक्ष केंद्रीत करण्यात अडचण
संतुलन बिघडणं
अखेर कोमामध्ये जाणं

मृत्यूदर आणि धोक्याची पातळी -
या संसर्गाचा प्रसार अतिशय जलद होतो.लक्षणं दिसू लागल्यानंतर फक्त १ ते १८ दिवसांच्या आत मृत्यू होण्याची शक्यता असते. यामुळे वेळेत उपचार घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

खबरदारी आणि सूचना-
पाण्यात पोहताना नाकात पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी.
नद्या, तलाव किंवा स्वच्छतेची योग्य काळजी न घेतलेले स्विमिंग पूल टाळावेत.
ताप, डोकेदुखी किंवा इतर वर उल्लेखित लक्षणं आढळल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

केरळमध्ये वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. हा अमिबा दुर्मिळ असला तरी संसर्ग झाल्यास तो अत्यंत प्राणघातक ठरतो, त्यामुळे वेळेत निदान आणि उपचार घेणं हाच सुरक्षिततेचा मार्ग आहे.





  Print






News - World




Related Photos