वर्ध्यात IKS ज्ञान महोत्सव’ मधून जागतिक विक्रम : विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला दिला नवा आयाम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : भारतीय ज्ञानपरंपरेच्या पुनरुज्जीवनाचा दीप प्रज्वलित करत जिल्ह्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सेवाग्राम येथील चरखागृह येथे आयोजित IKS ज्ञान महोत्सव- वर्ल्ड रेकॉर्ड उपक्रम अंतर्गत तब्बल ६३५ मॉडेल्सना एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये स्थान मिळाले आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डाएट, शिक्षण विभाग, सनशाईन सेल फाऊंडेशन, सेल अकॅडमी आणि विद्याभारतीच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव पार पडला. या दोन दिवसीय कार्यक्रमात जिल्ह्यातील १ हजार ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित ७०७ मॉडेल्स सादर केली. त्यापैकी ६३५ प्रकल्पांना अधिकृत वर्ल्ड रेकॉर्डची मान्यता मिळाली आहे. या महोत्सवात विद्यार्थ्यांनी प्राचीन भारताच्या ज्ञान विज्ञानक्षेत्रातील अमूल्य ठेवा आपल्या प्रकल्पांमधून सादर केला.
वैदिक, गणित, आयुर्वेद, खगोलशास्त्र, जलसंवर्धन, धातुकर्म, वास्तुशास्त्र, संगीत आणि नृत्य, प्राचीन कृषी प्रणाली, आयुर्वेद व रसशास्त्र, खगोलशास्त्र व कालमापन यांसारख्या विविध विषयांवरील मॉडेल्सनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. दैनंदिन जीवनातील नवकल्पना व प्राचीन साधनांचे आधुनिक उपयोग दाखवणाऱ्या प्रकल्पांनी विशेष आकर्षण निर्माण केले.
हजारो नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती -
या महोत्सवाला ८ हजाराहून अधिक नागरिकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलाकृती, संशोधन वृत्ती आणि सादरीकरण कौशल्याचे कौतुक केले. इंडिया व एशिया बुक ऑफ रेकॉर्डचे ॲडज्युकेटर शमनोज तत्वादी यांनी स्वतः या प्रकल्पांची तपासणी करून अधिकृत घोषणा केली. विद्यार्थ्यांचा सन्मानसर्व सहभागी विद्यार्थ्यांना वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र व मेडल्स प्रदान करण्यात आले. विशेष म्हणजे, सर्व विद्यार्थ्यांची नावे इंडिया आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये कायमस्वरूपी नोंदवण्यात आली आहेत, ही त्यांच्यासाठी एक अविस्मरणीय बाब ठरली आहे.
या यशस्वी उपक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर,जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, शिक्षणाधिकारी माध्यमिक जयश्री घारफळकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक महेंद्र गजभिये आणि डाएटचे मार्गदर्शन व सहकार्याचा मोलाचा वाटा राहिला. तसेच या उपक्रमासाठी सनशाईन सेल फाऊंडेशनच्या संचालिका पल्लवी पाटोदकर बोदिले व सुरज बोदिले यांनी विशेष मेहनत घेतली.
News - Wardha




Petrol Price




