महत्वाच्या बातम्या

 नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या तयारीला वेग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी मुंबई : संपूर्ण देशवासीयांचे लक्ष लागलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन सप्टेंबर अखेरीस होणार असून, त्यासाठी संबंधित यंत्रणांकडून नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक कामांना गती देण्यात आली आहे, असे अधिकृत प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

पनवेलजवळील उलवे नोडमध्ये तब्बल १,१६० हेक्टर क्षेत्रावर उभारलेल्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता ९ कोटी असून, अत्याधुनिक पायाभूत सुविधा, सक्षम दळवळण यंत्रणा आणि बहुआयामी कनेक्टिव्हिटीमुळे हे विमानतळ देशातील एक महत्त्वाचे वाहतूक केंद्र ठरणार आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी होणार असून, मुंबईसह नवी मुंबई, पुणे, नाशिक व कोकणातील प्रवाशांना थेट दिलासा मिळणार आहे.

वाहतुकीसाठी सुलभ प्रवेशद्वार -
विमानतळाच्या जवळ मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, गोवा महामार्ग व जेएनपीटी बंदर असल्याने प्रवास अधिक सोपा होणार आहे. विशेषतः मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (अटल सेतू) या नव्या पुलामुळे मुंबईकरांना जलद पोहोचता येणार आहे.

सरकारकडून या विमानतळाला वाहतुकीचे आधुनिक केंद्र बनवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असून, बेलापूर-पेन्धर मेट्रो लाईन उलवेपर्यंत वाढवण्याचे नियोजन आहे. तसेच, पनवेल स्थानकाला रिजनल हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे.

शटल सेवा व बस सोयी -
पुणे आणि कोकणातून येणाऱ्या प्रवाशांसाठी थेट शटल सेवा, तर एमएसआरटीसीमार्फत ठाणे, वाशी, दादर व पनवेलहून विशेष एअरपोर्ट एक्सप्रेस बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये इलेक्ट्रिक बसना प्राधान्य दिले जाणार आहे.

गुंतवणुकीला चालना, रोजगाराला दिशा -
सिडकोकडून विमानतळासाठी ९ किमी लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारण्यात येत असून, तो थेट टर्मिनलशी जोडला जाणार आहे. खारघर, उलवे व पनवेल परिसरात नव्या टाउनशिप, बिझनेस पार्क व लॉजिस्टिक हब निर्माण होणार असून, यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार व गुंतवणुकीच्या संधी निर्माण होतील.

मल्टी-एअरपोर्ट युगाची सुरुवात -
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर मुंबई दुबई, लंडन, न्यूयॉर्कप्रमाणे मल्टी-एअरपोर्ट सिस्टममध्ये प्रवेश करणार आहे. हे विमानतळ केवळ एक वाहतुकीचे केंद्र नसून, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा नवा टप्पा ठरणार असल्याचे सिडको व अदानी समूहाने स्पष्ट केले आहे.

संपूर्ण प्रदेशाला जोडणारी कनेक्टिव्हिटी -
या प्रकल्पासाठी रस्ता, रेल्वे व जलमार्गातून थेट प्रवेशाची सोय करण्यात आली असून, प्रवाशांना सहज, अखंड व वेगवान प्रवास अनुभवता येणार आहे. मुंबई महानगर प्रदेशाबरोबरच ठाणे, पुणे व नाशिक येथूनही सहज विमानतळावर पोहोचता येईल, असे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. या अदानी समूहाच्या कंपनीने स्पष्ट केले आहे.





  Print






News - World




Related Photos