महत्वाच्या बातम्या

 पंजाब महापुरात तळमळले : २९ बळी, १३०० गावं वेढ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / चंदीगड : पंजाब राज्य गेल्या महिन्याभरापासून आस्मानी संकटाचा सामना करत आहे. मुसळधार पावसामुळे रावी, सतलज आणि व्यास नद्यांचा रौद्रावतार पाहायला मिळत असून, राज्यातील जवळपास अर्धा पंजाब पाण्याखाली गेला आहे. तब्बल १३०० गावांना पुराने वेढा दिला असून, आतापर्यंत वेगवेगळ्या घटनांमध्ये २९ जणांचा मृत्यू झाला आहे. हजारो नागरिकांना घरदार सोडून मदत शिबिरात आश्रय घ्यावा लागत आहे.

अमृतसर जिल्ह्याची दुरवस्था -
या पुरात अमृतसर जिल्हा सर्वाधिक बाधित झाला असून, ३५ हजार नागरिक बेघर झाले आहेत. त्यानंतर फिरोजपूर जिल्ह्यात २४ हजार १५, फाजिल्कामध्ये २१ हजार ५६२, पठाणकोटमध्ये १५ हजार ५३, गुरुदासपूरमध्ये १४ हजार ५०० लोकांना स्थलांतर करावे लागले आहे. याशिवाय होशियारपूर, एसएएस नगर, कपूरथला, जालंधर, मोगा, मानसा आणि बरनाला या जिल्ह्यांमध्येही हजारो लोक विस्थापित झाले आहेत.

प्राणहानीचा आकडा वाढला -
राज्य सरकारच्या माहितीनुसार, सर्वाधिक सहा मृत्यू पठाणकोटमध्ये झाले आहेत. अमृतसर, बरनाला, होशियारपूर, लुधियाना, मानसा आणि रुपनगर जिल्ह्यात प्रत्येकी तीन जणांचा बळी गेला आहे. दरम्यान, पठाणकोटमध्ये तीन नागरिक बेपत्ता असल्याची नोंद आहे.

पूराचा गावोगावी तडाखा -
पुरामुळे गुरुदासपूरमधील ३२१, कपूरथला ११५, होशियारपूर ९४, अमृतसर ८८, पठाणकोट ८२, फिरोजपूर ७६, फाजिल्का ७२, मानसा ७७, मोगा ३९, जालंधर ५५, बरनाला २४ अशा एकूण १३०० गावांना पुराने वेढा दिला आहे. या आपत्तीमुळे सुमारे २ लाख ५६ हजार नागरिक विस्थापित झाले आहेत. दरम्यान, राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन चंदीगड आणि पंजाबमधील सर्व शाळा-महाविद्यालयांना ३ सप्टेंबरपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.





  Print






News - World




Related Photos