महत्वाच्या बातम्या

 गोंदिया-इंदूर हवाई सेवा १६ सप्टेंबरपासून सुरू


- बिरसी विमानतळावरून प्रवासी विमानसेवेचा विस्तार; इंदूरसाठी आठवड्यातून तीन दिवस उड्डाण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळावरून सुरू झालेल्या गोंदिया-हैदराबाद-तिरुपती प्रवासी विमानसेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आता याच विमानतळावरून गोंदिया-इंदूर विमानसेवेला येत्या १६ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. या नव्या विमानसेवेमुळे गोंदिया जिल्ह्यासह लगतच्या मध्य प्रदेश व छत्तीसगडमधील प्रवाशांनाही मोठा लाभ होणार आहे.

बिरसी येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळावर गेल्या वर्षभरात विमान वाहतुकीत लक्षणीय वाढ झाली आहे. इंडिगो कंपनीच्या हैदराबाद-तिरुपती सेवा सध्या आठवड्यातून दोन दिवस चालत असून दररोज ७० ते ८० प्रवासी या सेवेचा लाभ घेत आहेत.

१६ सप्टेंबरपासून गोंदिया-इंदूर सेवा सुरू -
स्टार एअर कंपनी गोंदिया-इंदूर हवाई सेवा सुरू करीत असून, ही सेवा आठवड्यातून मंगळवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी उपलब्ध असेल.

सेवेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे -
गोंदिया ते इंदूर : सायंकाळी ५:०० वाजता उड्डाण, ५:५५ वाजता आगमन
इंदूर ते गोंदिया : सायंकाळी ६:२५ वाजता उड्डाण, ७:२० वाजता आगमन

नाइट लँडिंगची सुविधा पुन्हा कार्यान्वित -
बिरसी विमानतळाची उभारणी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने करण्यात आली. प्रारंभी फ्लाय बिग कंपनीने गोंदिया-इंदूर सेवा सुरू केली होती. जून महिन्यात नाइट लँडिंगची सुविधा पुन्हा कार्यान्वित करण्यात आली असून, याला डीजीसीएची अधिकृत परवानगी प्राप्त झाली आहे.

विमानतळाची पाहणी पूर्ण -
गोंदिया-इंदूर सेवा सुरू करण्याआधी स्टार एअर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी १ सप्टेंबर रोजी विमानतळाची पाहणी करून आवश्यक सोयी-सुविधांचा आढावा घेतला. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सेवा सुरू करण्याचे निश्चित केले.





  Print






News - Gondia




Related Photos