रोहित शर्माचा विक्रम मोडून युएई कर्णधार मुहम्मद वसीम ठरला नवा सिक्सर किंग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / शारजाह : युएईचा कर्णधार मुहम्मद वसीम यानं शारजाहच्या मैदानावर अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० सामन्यात दमदार खेळ करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला. भारताचा हिटमॅन रोहित शर्मा याचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडून वसीमनं सिक्सर किंग म्हणून नवे पर्व सुरू केले.
आशिया कप स्पर्धेआधी सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत अफगाणिस्तानविरुद्ध धावांचा पाठलाग करताना UAE संघाला पराभव पत्करावा लागला. मात्र, संघाचा कर्णधार मात्र हार मानणारा नव्हता. त्याने ३७ चेंडूत ६७ धावांची खेळी साकारली. या खेळीत ४ चौकार आणि ६ गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. दुसऱ्याच षटकारासह त्याने रोहित शर्माचा विक्रम मागे टाकत इतिहास घडवला.
आता कर्णधार म्हणून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू म्हणून वसीम (११०) पहिल्या क्रमांकावर पोहोचला असून, त्याच्या पाठोपाठ रोहित शर्मा (१०५), इयॉन मॉर्गन (८६), अरॉन फिंच (८२), केंडेल कडोवाकी-फ्लेमिंग (७९) आणि जोस बटलर (६९) आहेत.
तथापि, एकूण टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम अद्यापही रोहित शर्माच्याच नावे आहे. रोहितनं आतापर्यंत २०५ षटकार ठोकले आहेत. त्याच्या खालोखाल वसीम (१७६), मार्टिन गप्टिल (१७३) आणि जोस बटलर (१६०) या फलंदाजांचा समावेश आहे.
शारजाहच्या मैदानावर वसीमने ठोकलेले हे षटकार त्याला खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला नवा सिक्सर किंग बनवून गेले.
News - World




Petrol Price




