महत्वाच्या बातम्या

 रशियाचा युक्रेनवर शेकडो ड्रोन व क्षेपणास्त्रांचा भीषण हल्ला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / कीव : रशिया-युक्रेन युद्धाला साडेतीन वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. अमेरिकेसह अनेक देशांकडून शांततेचे प्रयत्न सुरू असतानाच रशियाने युक्रेनवर शेकडो ड्रोन व क्षेपणास्त्रांचा मारा करून मोठा हवाई हल्ला चढवला आहे.

गुरुवारी रात्रभर सुरू असलेल्या या हल्ल्यांमध्ये रशियाने ५७४ ड्रोन आणि ४० क्षेपणास्त्रे डागल्याचे युक्रेनच्या हवाई दलाने सांगितले. यापैकी ५४६ ड्रोन आणि ३१ क्षेपणास्त्रे युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणांनी हवेतच पाडली. तरीदेखील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा हल्ला गेल्या काही आठवड्यांतील सर्वात मोठा असल्याचे युक्रेनने म्हटले आहे.

रिवने ओब्लास्टमध्ये तीन मोठे स्फोट घडले असून राजधानी कीवमध्येही ड्रोन हल्ले झाले. रशियाने बॉम्बर विमाने आणि ड्रोनच्या मदतीने हल्ले चढवल्याने युक्रेनमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, २० ऑगस्ट रोजी युक्रेनने रशियाच्या ताब्यातील पॉवर प्लांटवर ड्रोन हल्ला करून वीजपुरवठा खंडित केल्याचा आरोप रशियाने केला होता. त्यानंतर २१ ऑगस्ट रोजी प्रत्युत्तर म्हणून रशियाने हे भीषण हल्ले केल्याचे स्पष्ट झाले आहे.

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, युक्रेनला पाश्चिमात्य देशांकडून दिल्या जाणाऱ्या सुरक्षा हमीवर जर रशियाला सामील केले नाही, तर सर्व प्रयत्न निरर्थक ठरतील. नाटो देशांच्या व्हर्च्युअल बैठकीत युक्रेनच्या सुरक्षा हमीवर चर्चा सुरू असतानाच त्यांनी हे विधान केले.





  Print






News - World




Related Photos