प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवच्या गुरुग्राममधील आलिशान घरावर गोळीबार


- CCTV फुटेज व्हायरल; भाऊ गँगने घेतली जबाबदारी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / हरियाणा : प्रसिद्ध युट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी विजेता तसेच लाफ्टर शेफ सीझन २चा विजेता एल्विश यादव याच्या आलिशान घरावर पहाटे अज्ञात दोन व्यक्तींनी अंधाधुंद गोळीबार केला. ही धक्कादायक घटना गुरुग्रामच्या सेक्टर ५६ येथे घडली. सुदैवाने या घटनेच्या वेळी एल्विश यादव घरात नव्हते. घरात केवळ केअरटेकर होता. त्याने तातडीने पोलिसांना माहिती दिली. या अचानक झालेल्या घटनेने यादव कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, या घटनेचे थरकाप उडवणारे CCTV फुटेज एल्विश यादवच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आले असून, यात दोन युवक घरावर सलग गोळ्या झाडताना दिसत आहेत. घराच्या दरवाजे व भिंतींवर गोळ्यांचे ठसे उमटलेले स्पष्ट दिसतात. गोळीबारानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. काही मिनिटांतच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
आरोपींनी चेहऱ्यावर कपडा बांधलेला असल्याने त्यांची ओळख पटलेली नाही. मात्र लवकरच आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करू, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या गोळीबाराची जबाबदारी नीरज फरीदपूर आणि भाऊ रीतुलिया या गुंडांनी घेतली आहे. दोघेही कुख्यात गँगस्टर हिमांशू भाऊ टोळीशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. ही टोळी भाऊ गँग म्हणून ओळखली जाते. एल्विश यादवने एका बेटिंग अॅपची जाहिरात केल्यानेच गोळीबार केला, असे या गँगने सोशल मीडियावर पोस्टद्वारे कबूल केले आहे. या अॅपमुळे अनेक कुटुंबांचे नुकसान झाले असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला आहे.
एल्विश यादव केवळ यूट्यूबवरच नव्हे तर टीव्ही आणि ग्लॅमर जगतातही प्रसिद्ध आहे. गुरुग्राममध्ये त्याने बांधलेले १६ बीएचके आलिशान घर तब्बल १० कोटी रुपये खर्च करून उभारले आहे. याशिवाय दुबईमध्येही त्याचे ८ कोटी रुपये किंमतीचे भव्य घर असल्याचे समजते.
News - World




Petrol Price




