गोंदिया शहर चार तासांत जलमय : ९५ गावांना सतर्कतेचा इशारा, जिल्ह्यातील १७ मार्ग बंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शनिवारी (२६) पहाटे ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत मुसळधार स्वरूप घेतल्याने गोंदिया शहरासह संपूर्ण जिल्हा अक्षरशः जलमय झाला. चार तासांच्या जोरदार पावसाने रस्ते, वस्त्या, रुग्णालये जलमय झाली असून अनेक ठिकाणी नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
रस्त्यांना तलावाचे स्वरूप -
शनिवारी पहाटेपासून झालेल्या पावसामुळे शहरातील न्यू लक्ष्मीनगर, छोटा गोंदिया, सिव्हिल लाईन, सिंधी कॉलनी, परमात्मा एक नगर, सूर्याटोला, राणी अवंतीबाई चौक व गोरेलाल चौक परिसरात रस्ते जलमय झाले होते. सखल भागातील अनेक वस्त्यांमध्ये घरात पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
वैद्यकीय सेवेला फटका -
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) व बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या आवारातही पाणी साचल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना उपचारासाठी प्रवेश घेण्यास अडचणींचा सामना करावा लागला
नगर परिषदेवर संताप -
शहरातील नाले साफसफाई वेळेत न झाल्यामुळे व अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्याने पाण्याचा निचरा होऊ न शकल्याची तक्रार नागरिकांनी केली. परिणामी पाणी घरात शिरल्याने झालेल्या नुकसानाबद्दल नागरिकांनी नगर परिषदेवर तीव्र संताप व्यक्त केला.
१७ मार्ग बंद, अनेक गावांचा संपर्क तुटला -
सलग पावसामुळे जिल्ह्यातील १७ मार्ग जलमय होऊन बंद झाले असून अनेक गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. यात देवरी, अर्जुनी मोरगाव, आमगाव व गोरेगाव तालुक्यातील रस्ते मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहेत.
धरणांचे दरवाजे उघडले, नदीकाठच्या ९५ गावांना सतर्कतेचा इशारा -
पावसाच्या जोरामुळे पुजारीटोला, कालीसरार व शिरपूरबांध या प्रमुख धरणांचे दरवाजे उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या ९५ गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
जिल्हाधिकारी प्रजित नायर यांची तातडीची कारवाई -
परिस्थितीचा आढावा घेत जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी शनिवारी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली.
तालुकानिहाय पावसाचा आढावा (मिमी) -
सालेकसा : ८४.०, गोंदिया : ७५.८, आमगाव : ७४.५, गोरेगाव : ४९.३, देवरी : ४८.९, सडक अर्जुनी : ४३.३, अर्जुनी मोरगाव : ३७.४, तिरोडा : २२.९, एकूण सरासरी : ५४.६ मिमी
प्रमुख धरणातील साठा -
इटियाडोह : ६८.९%, शिरपूरबांध : ६४.२२%, कालीसरार : ५७.२५%, पुजारीटोला : ६१.४३%
पाण्याचा विसर्ग -
पुजारीटोला – ८ दरवाजे उघडून ८३०५ क्युसेक, कालीसरार – ५ दरवाजे, ३२५७.७५ क्युसेक, शिरपूरबांध – ४ दरवाजे, १५२० क्युसेक
News - Gondia




Petrol Price




