महत्वाच्या बातम्या

 हरभरा पिकावरील मुळकुज व मर रोगाचे वेळीच व्यवस्थापन करा


- कृषी विज्ञान केंद्राचे शेतकऱ्यांना आवाहन; रोगांची लक्षणे ओळखून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा सल्ला

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यात हरभरा पीक सध्या रोपावस्थेतून वाढीच्या अवस्थेत जात असून, काही भागांत हरभरा पिकावर मुळकुज रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येत आहे. तसेच सिंचनाची सुविधा असलेल्या आणि अतिरिक्त सिंचित क्षेत्रातील हरभरा पिकावर मर रोगाचा सौम्य प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगांमुळे पिकातील रोपांची संख्या कमी होऊन उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा पिकाचे नियमित निरीक्षण करून रोगांची लक्षणे दिसताच योग्य व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा येथील विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) डॉ. निलेश वझिरे तसेच वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे यांनी केले आहे.

वातावरणातील सातत्याने होणारे बदल, पेरणीपूर्वी बियाण्याची बीजप्रक्रिया न करणे आणि जमिनीतील बुरशी यांसारख्या कारणांमुळे हरभरा पिकावर मुळकुज व मर रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. या रोगांचा प्रसार प्रामुख्याने रोगग्रस्त बियाणे आणि जमिनीत वास्तव्य करणाऱ्या बुरशीमुळे होतो. त्यामुळे पिकाचे नुकसान टाळण्यासाठी रोगांची लक्षणे वेळीच ओळखणे महत्त्वाचे आहे.

मर रोगाची लक्षणे -
हरभरा पिकावरील मर रोग फ्युजेरियम ऑक्सिस्पोरम सायसेरी या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर झाडांची पाने पिवळी पडून कोमेजतात. झाडाचा शेंडा मलूल होतो आणि संपूर्ण झाड हिरवे असतानाच वाळून जाते. हा रोग पिकाच्या सुरुवातीच्या रोपावस्थेत तसेच सहा आठवड्यांनंतरच्या प्रौढ अवस्थेतही दिसून येतो. मर रोगग्रस्त झाड सहजासहजी जमिनीतून उपटून येत नाही. त्यामुळे अशी लक्षणे दिसणाऱ्या झाडांकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

मुळकुज रोगाची लक्षणे -
मुळकुज रोग रायझोक्टोनिया सोलानी किंवा रायझोक्टोनिया बटाटीकोला या जमिनीत वास्तव्य करणाऱ्या बुरशीमुळे होतो. जास्त ओलावा असलेली जमीन, पाणी देऊन केलेली पेरणी तसेच काळी व भारी जमीन अशा परिस्थितीत या रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळतो. या रोगामुळे झाडांची पाने पिवळी पडतात; मात्र झाड लगेच कोलमडत नाही. जमिनीलगतची मुळे कुजल्यामुळे रोगग्रस्त झाड सहजपणे उपटून येते.

रायझोक्टोनिया बटाटीकोला या बुरशीमुळे होणाऱ्या कोरड्या मुळकुज रोगात संपूर्ण झाड वाळून जाते. अशी वाळलेली झाडे शेतात विखुरलेल्या स्वरूपात दिसतात. साधारणतः ३० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान असताना या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो. त्यामुळे जमिनीतील ओलावा आणि तापमानाच्या परिस्थितीनुसार शेतकऱ्यांनी पिकाचे निरीक्षण करणे गरजेचे आहे.

रोग व्यवस्थापनासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या महत्त्वपूर्ण सूचना -
मुळकुज किंवा मर रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पुढील तीन ते चार वर्षे हरभरा पीक घेणे टाळावे. त्याऐवजी योग्य पीक फेरपालट करावा. पेरणीसाठी रोगप्रतिकारक वाणांची निवड करावी आणि पेरणीपूर्वी शिफारशीनुसार बियाण्याची बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. यामुळे रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होऊ शकते. पेरणीच्या आठ ते दहा दिवस आधी जमिनीत थोडासा ओलावा असताना ट्रायकोडर्मा या मित्रबुरशीचा वापर करण्याबाबत कृषी विज्ञान केंद्राने उपाय सुचविले आहेत. यासाठी ट्रायकोडर्मा दोन किलो किंवा दोन लिटर प्रति एकर या प्रमाणात २५ ते ३० किलो शेणखतात मिसळून शेतात समप्रमाणात पसरविण्याची पद्धत सध्या प्रयोगाधीन आहे.

तसेच पेरणीनंतर ज्या क्षेत्रात रोगाचा अधिक प्रादुर्भाव आढळून येतो, अशा ठिकाणी ट्रायकोडर्मा दोन किलो किंवा दोन लिटर प्रति एकर या प्रमाणात २०० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून देण्याची शिफारस ॲग्रेस्कोमार्फत करण्यात आली आहे. या उपाययोजना करताना संबंधित शिफारशींचे पालन करावे आणि कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.हरभरा हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक असून, मुळकुज व मर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोगांची लक्षणे वेळीच ओळखून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. योग्य पीक फेरपालट, रोगप्रतिकारक वाणांची निवड, बीजप्रक्रिया आणि मित्रबुरशीचा शिफारशीनुसार वापर करून पिकाचे संभाव्य नुकसान टाळावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.





  Print






Related Photos