महत्वाच्या बातम्या

 बालविवाह मुक्त भारतासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती : संविधान दिनी सामूहिक प्रतिज्ञा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून बालविवाहमुक्त भारत अभियानांतर्गत २६ नोव्हेंबर रोजी बल्लारपूर येथील जनता हायस्कूल (टेकडी विभाग) येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जनता हायस्कूल आणि रेल्वे चाइल्ड हेल्पलाइन, बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील मूल्ये, बालकांचे हक्क, बालकांची काळजी व संरक्षणासंबंधी कायदे यांची माहिती देण्यात आली. बालपण हे शिक्षण घेण्यासाठी, खेळण्यासाठी आणि स्वप्ने पाहण्यासाठी असते, लग्नाच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी नाही, असा संदेश यावेळी देण्यात आला. बालविवाह रोखणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाचे कर्तव्य असल्याचेही सांगण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. एम. बोबडे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पर्यवेक्षक भास्कर ठाकूर, सुरेंद्र धोडरे आणि विजय अमर्थाराज मिल्कू केस वर्कर, रेल्वे चाइल्ड हेल्पलाइन, बल्लारपूर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक राघोबा आलाम, संतोष चव्हाण, सुनीता लोधे (सहाय्यक शिक्षिका) आणि जी. एम. चंदावार (वरिष्ठ लिपिक) उपस्थित होते. भास्कर ठाकूर यांनी संविधान दिनाचे महत्त्व, बालकांचे हक्क व कर्तव्ये, बालसंरक्षणविषयक कायदे, मोबाईलचा अतिवापर, चांगला स्पर्श व वाईट स्पर्श यातील फरक याबाबत मार्गदर्शन केले. तसेच चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८, पोलीस हेल्पलाइन क्रमांक ११२ आणि बालकांच्या संरक्षणासाठी कार्यरत विविध यंत्रणांची माहिती दिली.

शिक्षक राघोबा आलाम यांनी संविधानाचा आदर करणे म्हणजे केवळ संविधानाची प्रस्तावना वाचणे नव्हे, तर दैनंदिन जीवनात समानता, बंधुता, शिस्त आणि न्याय या संवैधानिक मूल्यांचे पालन करणे होय, असे प्रतिपादन केले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी संविधान दिन आणि बालविवाहमुक्त भारत या विषयांवर सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा घेण्यात आली. यात विजयी झालेल्या विद्यार्थिनींना प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून नोटबुक प्रदान करण्यात आल्या. तसेच बालविवाहमुक्त भारत घडविण्यासाठी आणि राष्ट्रीय अभियानात सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी उपस्थितांनी सामूहिक प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाचे संचालन सुरेंद्र धोडरे यांनी केले, तर आभार विजय अमर्थाराज मिल्कू यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.






  Print






Related Photos