केंद्र व राज्यांचे संबंध अधिक सुदृढ : मुख्यमंत्री


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
केंद्र आणि राज्यांचे संबंध आता अधिक सुदृढ झाले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या  प्रगती व्हिडिओ कॉन्फरसिंगमुळे केंद्र व राज्यांमध्ये योग्य सुसंवाद निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
हिंदुस्थान टाईम्स लीडरशीप समीट  कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर  सिंग, कर्नाटक चे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी उपस्थित होते. केंद्र व राज्य संबंध, जीएसटी, इंधन दरवाढ राज्यांचे विकास प्रकल्प आदी विषयांवर यावेळी आयोजित चर्चासत्रात मुख्यमंत्र्यांनी आपले विचार मांडले.
मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले, केंद्र व राज्य यामधील संबंध आता अधिक सुदृढ  झाले आहेत, राज्यांना आपल्या समस्यांविषयी आता केंद्राकडे जावे लागत नाही, कारण प्रधानमंत्र्यांनी प्रगती व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून सुसंवाद घडवून आणला आहे. या प्रयत्नांमुळे अनेक राज्यांना विविध  विकास कामांच्या परवानग्या सहज मिळू लागल्या आहेत. गेल्या चार वर्षात महाराष्ट्राला अनेक विकास प्रकल्पाचे मंजुरी आदेश केंद्राच्या प्रगती धोरणामुळे मिळालेले आहेत.
जीएसटी बद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, पेट्रोल व डिझेल ला जीएसटी अंतर्गत समाविष्ट करण्याचे महाराष्ट्र समर्थन करते, परंतु निव्वळ पारंपरिक व्यवस्थेवर अवलंबून न राहता आता पर्याय शोधण्याची वेळ आली आहे. इथेनॉलचे धोरण हा भविष्यातला योग्य पर्याय आहे, यामुळे पुढील पाच वर्षात आपण 30 टक्क्यांपर्यंत निर्यात कमी करु शकतो. देशात अन्न-धान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे जैव इंधन निर्मित करणे काळाची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबईचे शांघाय कधी होणार ?  या प्रश्नावर मुख्यमंत्री  म्हणाले, मुंबई ही मुंबईच राहिली पाहिजे, मुंबई शहराची एक वेगळी ओळख आहे, त्यामुळे मुंबईला कोणतेही दुसरे शहर न बनविता मुंबईच राहू द्यावी असे सांगुन मुंबईचा विकास हे शासनाचे धोरण आहे, यासाठी आम्ही मेट्रो, मोनोरेल, सागरी मार्ग, जलमार्ग प्रकल्प हाती घेतले आहेत,अशी माहिती मुख्यमंत्री यांनी यावेळी दिली. गेल्या 60 वर्षाच्या तुलनेत मागील चार वर्षात मुंबईत 1 लाख कोटींची विकास कामे सुरु करण्यात आलेली आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यास आमचे प्राधान्य आहे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या चर्चासत्राचे समन्वय सीएनएन  न्यूज 18 चॅनलचे उपकार्यकारी संपादक आनंद नरसिंम्हन यांनी केले.

   Print


News - World | Posted : 2018-10-07


Related Photos