शेतातील धान चोरीचा स्मार्ट घड्याळाने लावला छडा : वॉलपेपरवरील फोटोवरून आरोपीची ओळख, मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : शेतात वाळविण्यासाठी ठेवलेल्या धानाची चोरी करून चोरट्याने शेतकऱ्याच्या घामाच्या कमाईवर डल्ला मारला. मात्र, चोरीच्या ठिकाणी सापडलेल्या एका स्मार्ट घड्याळामुळे या चोरीचा छडा लागला. घड्याळाच्या वॉलपेपरवरील छायाचित्रावरून आरोपीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. विकास डुकरू गेडाम २६ वर्ष , रा. येसगाव असे आरोपीचे नाव आहे. यादव आडकु मोहुर्ले ५२ वर्ष , रा. दहेगाव, ता. मूल यांनी आपल्या शेतातील दोन पोती म्हणजेच एक क्विंटल धान चोरी झाल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. चोरी झालेल्या धानाची किंमत ५ हजार ५०० रुपये आहे.
यादव मोहुर्ले यांची दहेगाव चक शिवारात सर्वे क्रमांक २९ मध्ये तीन एकर शेती आहे. यंदा त्यांनी शेतात जी-९ जातीच्या बारीक धानाची लागवड केली होती. १५ नोव्हेंबर रोजी हार्वेस्टरच्या साहाय्याने धानाची कापणी करून ओले धान शेतात वाळविण्यासाठी ठेवले होते. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत धान शेतात व्यवस्थित होते. मात्र, १९ नोव्हेंबर रोजी सकाळी शेतात गेले असता दोन पोती धान गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
शेतात आणि परिसरात शोध घेतल्यानंतरही धान मिळाले नाही. मात्र, धान ठेवलेल्या जागेजवळ नारंगी रंगाचा बेल्ट असलेले स्मार्ट घड्याळ आढळून आले. या घड्याळाच्या वॉलपेपरवर एका मुलाचे छायाचित्र होते. त्या छायाचित्राच्या आधारे शोध घेतला असता संबंधित व्यक्तीची ओळख विकास गेडाम अशी पटली. अशा प्रकारे स्मार्ट घड्याळ चोरीच्या तपासातील महत्त्वाचा दुवा ठरले. या प्रकरणी मूल पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास मूलचे ठाणेदार विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नरेश कोडापे करीत आहेत.




Petrol Price




