महत्वाच्या बातम्या

 मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन


- NSP पोर्टलवर अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागासवर्गीय (इमाव), विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) व विमुक्त जाती-भटक्या जमाती (विजाभज) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ करिता अर्ज नोंदणी सुरू आहे. पात्र विद्यार्थ्यांनी केंद्र शासनाच्या नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल (NSP) तसेच राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर संबंधित योजनेनुसार अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाने केले आहे.

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना : इयत्ता ९ वी व १० वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या आणि पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी पीएम यशस्वी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना (PM YASASVI Pre-Matric Scholarship Scheme) अंतर्गत NSP पोर्टलवर अर्ज करावेत. तसेच इयत्ता ५ वी ते ८ वी मधील पात्र मुली आणि इयत्ता ९ वी व १० वी मधील ज्या मुलींच्या पालकांचे उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, अशा मुलींनी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत. याशिवाय विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती तसेच सैनिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता आदी योजना उपलब्ध आहेत.

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना : इयत्ता १० वी नंतरचे शिक्षण घेणाऱ्या इमाव, विमाप्र व विजाभज प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहेत. पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या आणि सन २०२५-२०२६ मध्ये अभ्यासक्रम सुरू केलेल्या संबंधित पात्र विद्यार्थ्यांनी पीएम यशस्वी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना (PM YASASVI Post-Matric Scholarship Scheme) अंतर्गत NSP पोर्टलवर अर्ज करावेत.

महाडीबीटी पोर्टलवर राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती (फ्रीशिप), व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती तसेच आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांसाठी शुल्क परतावा आदी योजना उपलब्ध आहेत.

अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत : NSP पोर्टलवर विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२६ असून, शाळा व महाविद्यालय स्तरावर अर्ज तपासणीची अंतिम तारीख १५ डिसेंबर २०२६ आहे.

संबंधित शाळा, विद्यालये व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांनी पात्र विद्यार्थ्यांना योजनांची माहिती देऊन अर्ज नोंदणीसाठी आवश्यक मार्गदर्शन करावे. तसेच एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक स्वप्निल पापडकर यांनी केले आहे.





  Print






Related Photos