महत्वाच्या बातम्या

 राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासाला नवी झेप : शेतकरी भवन, गोदाम व व्यापारी संकुलाची उभारणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : शेतकऱ्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पायाभूत सुविधांचा विस्तार आणि व्यापारी विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. बाजार समितीच्या प्रांगणात प्रस्तावित शेतकरी भवन, आधुनिक गोदाम आणि व्यापारी संकुलाच्या विकासकामांचे भूमिपूजन तसेच नव्याने उभारण्यात आलेल्या खुल्या लिलाव शेडचे लोकार्पण माजी आमदार तथा चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष धोटे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. शेतकऱ्यांना शेतमालाच्या विक्रीसाठी सुसज्ज बाजारपेठ, सुरक्षित साठवणूक व्यवस्था आणि आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. शेतकरी भवनामुळे शेतकऱ्यांना विविध कामांसाठी सोयी-सुविधा मिळणार असून, आधुनिक गोदामामुळे शेतीमाल साठवणुकीची क्षमता वाढणार आहे. तर व्यापारी संकुलामुळे व्यापाऱ्यांना व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होऊन बाजार समितीच्या उत्पन्नातही भर पडणार आहे.

यावेळी बोलताना माजी आमदार सुभाष धोटे म्हणाले की, शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असून कृषी उत्पन्न बाजार समितीचा आत्मा आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळण्यासाठी केवळ उत्पादन वाढणे पुरेसे नाही, तर शेतमालाच्या विक्रीसाठी सक्षम बाजारपेठ, योग्य साठवणूक व्यवस्था आणि आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध होणेही तितकेच आवश्यक आहे.

राजुरा बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी भवन, गोदाम, व्यापारी संकुल आणि लिलाव शेडची उभारणी होणे ही समाधानाची बाब आहे. बाजार समितीचा विकास केवळ इमारतींच्या उभारणीपुरता मर्यादित न राहता तो शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीशी जोडला गेला पाहिजे. भविष्यातही शेतकरी हिताला केंद्रस्थानी ठेवून बाजार समितीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहू, असे त्यांनी सांगितले.

बाजार समितीचे सभापती तिरुपती मलय्या इंदुरवार यांनी बाजार समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या तसेच भविष्यात प्रस्तावित असलेल्या विकासकामांचा आराखडा सादर केला. नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्यासह उपस्थित संचालकांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती तिरुपती मलय्या इंदुरवार होते. प्रमुख उपस्थितीमध्ये नगराध्यक्ष अरुण धोटे, उपसभापती संजय पावडे, संचालक अॅड. अरुण धोटे, विकास देवाळकर, उमाकांत धांडे, विनोद झाडे, दिलीप देठे, गोपाल झंवर, नवनाथ पिंगे, राकेश हिंगाने, लहू बोंडे, सरिता रेड्डी, जगदीश बुटले, प्रफुल कावळे, आशिष नलगे, विठाबाई झाडे, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा कुंदाताई जेणेकर, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, शहराध्यक्ष हरजीतसिंग संधू यांच्यासह अनेक पदाधिकारी, नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजार समितीच्या सचिव मोनिका मेश्राम यांनी केले. संचालन संचालक गोपाल झंवर यांनी केले, तर आभार वरिष्ठ लिपिक पराग बोढे यांनी मानले. यावेळी बाजार समितीचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, व्यापारी, मापारी आणि हमाल बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






Related Photos