देवळीतील एसएमडब्ल्यू इस्पात प्रकल्पास उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत यांची भेट


- प्रकल्पाच्या अडीअडचणी जाणून घेत गुंतवणुकीचे केले कौतुक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत यांनी देवळी एमआयडीसीतील एसएमडब्ल्यू इस्पात प्रा. लि.(संगम) प्रकल्पास भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाची सद्यस्थिती जाणून घेत व्यवस्थापनाशी संवाद साधत प्रकल्पाच्या कामकाजासंदर्भातील अडीअडचणी जाणून घेतल्या.
वर्धा येथे आयोजित जिल्हा गुंतवणूक परिषदेत एसएमडब्ल्यू इस्पात प्रा. लि. कंपनीने ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. या गुंतवणुकीमुळे देवळी परिसरातील औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासोबतच स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
जिल्ह्यात उद्योगांना पोषक वातावरण निर्माण होत असून स्थानिक उद्योजकांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीला प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत यांनी नमूद केले. एसएमडब्ल्यू इस्पात प्रा. लि. कंपनीने केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या निर्णयाचे त्यांनी कौतुक केले.
उद्योगांच्या विस्तारासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, प्रशासकीय बाबी तसेच अन्य अडचणी दूर करण्यासाठी शासन सकारात्मक असून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला प्राधान्य देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.




Petrol Price




