आरमोरी बर्डी येथे ९ लाख ५० हजारांची दारू व मुद्देमाल जप्त, ४ आरोपींवर गुन्हा दाखल


- स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : स्थानिक गुन्हे शाखा पथकाने आरमोरी बर्डी येथे आज, २० जून रोजी दुपारी २.३० ते ३.४५ वाजताच्या दरम्यान सापळा रचून ९ लाख ५० हजार रुपयांची दारू व मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या आदेशान्वये पोलिस पथक आज, २० जून रोजी आरमोरी परिसरात गस्त करीत असताना आरमोरी बर्डी व देसाईगंज येथील ठोक दारू विक्रेते अवैधरित्या दारूचा पुरवठा करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून आरमोरी बर्डी येथील ठोक दारू विक्रेता राूल टेंभुर्णे याच्या घराजवळील रस्त्यावर आपले अस्तित्व लपवून पोलिसांनी पाळत ठेवली असता एक चारचाकी वाहन राहूल टेंभुर्णे याच्या घराजवळ थांबली. त्यावेळेस पाळत ठेवलेल्या पोलिसांना बघून आपल्या ताब्यातील चारचाकी वाहन व दारुसाठा घटनास्थळी सोडून चार इसम पळून गेले. त्यांचा पाठलाग केला असता ते मिळून आले नाही. पळून जाणारया चारही इसमांची ओळख पटविण्यात आली असून तुफानसिंग राजूसिंग पटवा रा. देसाईगंज, राहूल कैलास टेंभुणे, प्रवीण भाउराव खोब्रागडे, गुड्डू रेकचंद ठवरे तीनही रा. आरमोरी असे त्या आरोपींची नावे असल्याची माहिती मिळाली. सदर चारही फरार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळावरील ३ लाख १२ हजार रुपये किंमतीच्या संत्रा देशी दारुच्या ३९ पेट्या, ८८ हजार रुपये किंमतीच्या देशी दारु सुप्रीम न. १ च्या ११ पेट्या, ५ लाख ५५ हजार रुपये किंमतीचे दारू वाहतुकीसाठी वापरलेले एसएक्स ४ मारुती सुझुकी कंपनीचे चारचाकी वाहन (क्र. एमएच ३१ सीआर ०३२२) असा एकूण ९ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. कोरेाना लाॅकडाऊन काळात अवैधरित्या दारूची वाहतूक करून दारू विक्रेत्यांना पुरवठा करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई सुरू केल्याने दारू पुरवठा करणाऱ्या व विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
News - Gadchiroli | Posted : 2020-06-20