महत्वाच्या बातम्या

 पोथरा नाला धरणात वाघाचा मृतदेह आढळला : मृत्यूच्या कारणाबाबत गूढ कायम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील पोथरा नाला धरण परिसरात एका वाघाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळल्याने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. फत्तेपूर गावाजवळील कॅनॉल क्रमांक १२ परिसरात आज दुपारी ३ ते ३.१५ वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. मृत वाघाचे वय अंदाजे अडीच ते तीन वर्षे असल्याची माहिती आहे.

कॅनॉल परिसरातून जाणाऱ्या काही शेतकऱ्यांना पाण्यात वाघाचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी तातडीने वनविभागाला याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील मडावी यांनी पथकासह घटनास्थळ गाठले. मृत वाघाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला आणि पुढील तपासणीसाठी मृतदेह ताडोबा ट्रान्झिट सेंटर, चंद्रपूर येथे पाठविण्यात आला.

विशेष म्हणजे, मृत वाघाच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या बाह्य जखमा किंवा मारहाणीच्या खुणा आढळून आलेल्या नाहीत. मात्र, त्याचे शरीर फुगलेल्या अवस्थेत असल्याने मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय वनाधिकारी रंजन तलमले यांनीही घटनास्थळी भेट दिली. वाघाचा मृत्यू पाण्यात बुडून झाला की अन्य कोणत्या कारणामुळे, याबाबत सध्या स्पष्टता नाही. उद्या, १७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. त्यामुळे वनविभागाचे लक्ष आता शवविच्छेदन अहवालाकडे लागले आहे.





  Print






Related Photos