बाजारातून परतणाऱ्या ६८ वर्षीय वृद्धाला भरधाव वाहनाची धडक; पायाचे हाड मोडले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : बाजारातून खरेदी करून घरी परतण्याच्या तयारीत असलेल्या ६८ वर्षीय वृद्धाला भरधाव अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या उजव्या पायाचे हाड मोडले असून ते गंभीर जखमी झाले. १४ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास नागभीड येथील राममंदिर चौकात ही घटना घडली. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील चनेवाडा येथील चंद्रभान सोमा गायकवाड (६८) हे नातवाच्या दुचाकीने नागभीड येथे बाजारात खरेदीसाठी आले होते.
खरेदी आटोपल्यानंतर ते पायी बसस्थानकाच्या दिशेने जात असताना राममंदिर चौकातील चहाच्या दुकानासमोर मागून आलेल्या भरधाव अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर वाहनाचे चाक त्यांच्या उजव्या पायावरून गेल्याने त्यांच्या पायाचे हाड मोडले. अपघातानंतर जखमी अवस्थेत असलेल्या गायकवाड यांच्या मदतीला त्यांचे परिचित युसुफ पठाण धावून आले. त्यांनी तातडीने ऑटोने गायकवाड यांना ग्रामीण रुग्णालय, नागभीड येथे दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
याप्रकरणी चंद्रभान गायकवाड यांच्या अहवालावरून नागभीड पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध हिट अँड रनचा गुन्हा दाखल केला असून, फरार वाहनचालकाचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस हवालदार दिलीप चौधरी करीत आहेत.




Petrol Price




