रामनगर पोलिसांकडून जबरी चोरी आणि घरफोडीचे गुन्हे उघडकीस, ३ दुचाकी व मोबाईलसह १ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त


- ४ आरोपींना केली अटक, २ विधिसंघर्षित बालकांचा समावेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
रामनगर पोलिसांनी जबरी चोरी आणि घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून ३ दुचाकी व मोबाईलसह १ लाख ८१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे चोरांचे धाबे दणाणले असून रामनगर चंद्रपूर पोलिसांचे कौतूक करण्यात येत आहे. याबाबत सविस्तर असे की, १८ मे २०२० रोजी फिर्यादी राजेश नारायण पोलेवार (३८) रा. सरकारनगर (चंद्रपर) हे रात्री ९ वाजताच्या सुमारास घराजवळ फोनवर बोलत असताना एका दुचाकीवर तीन इसम येवून त्यांच्या हातातील ७० हजार रुपये किंमतीचा कंपनीचा मोबाईल जबरीने हिसकावून नेला. याबाबत पोलिस स्टेशन रामनगर येथे तक्रार दाखल करण्यात आली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या घटनेचे घटनास्थळ गाठून संशयितांना तपासण्यात आले. दरम्यान इंदिरानगर येथे एका मोबाईलवर तीन इसमांमध्ये वाद सुरू असल्याची माहिती मिळाली. यावरून गुन्हे शोध पथकाने तत्काळ त्या ठिकाणी पोहचून काही तासातच सदर गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेवून त्यांना विचारपूस केली व त्यांच्या जवळून गुन्ह्यातील चोरीचा मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली ६५ हजार रुपये किंमतीची एक होंडा डिओ कंपनीचे वाहन असा एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्ह्यातील आरोपी जगदीश जाधव (२१) रा. इंदिरानगर (चंद्रपूर) यास अटक करण्यात आली असून इतर दोन विधिसंघर्षित बालके आहेत. तसेच रामनगर पोलिसांनी पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यापैकी तीन गुन्हे उघडकीय आणले आहेत. ज्यामध्ये २५ हजार रुपये किंमतीची एक दुचाकी व दुसरया गुन्ह्यातील १५०० रुपये असा एकूण ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी, चंद्रपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हाके यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक संदीप कापडे, सहायक फौजदार प्रभुदास माउलीकर, पोलिस हवालदार रजनीकांत पुठ्ठावार, आनंद परचाके, पुरुषोत्तम चिकाटे, पोलिस शिपाई विकास जुमनाके यांनी केली आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2020-05-19


Related Photos