महत्वाच्या बातम्या

 बेलसनीतील पोलाद कंपनीत २५ ते ३० जणांचा जबरदस्तीने प्रवेश : काम बंद पाडण्याची धमकी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : स्थानिकांना रोजगार देण्याच्या मागणीसाठी २५ ते ३० महिला-पुरुषांनी बेलसनी येथील धमिलियन पोलाद कंपनीच्या प्रवेशद्वारावर गोंधळ घालत जबरदस्तीने कंपनीत प्रवेश केल्याची घटना २ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. यावेळी कंपनीचे काम बंद पाडण्याची धमकी दिल्याप्रकरणी घुग्घुस पोलिसांनी सहा नामनिर्देशित आरोपींसह इतरांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, २ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास भद्रावती तालुक्यातील मुरसा येथील जगदीश लवाडिया हा २५ ते ३० महिला-पुरुषांना घेऊन कंपनीच्या प्रवेशद्वारावर पोहोचला. यावेळी त्यांनी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक निखिल राय यांची भेट घडवून देण्याची मागणी केली. त्यानंतर प्रकल्प व्यवस्थापक अखिलेश रॉय हे प्रवेशद्वारावर आले आणि त्यांनी चर्चेसाठी सर्वांना कार्यालयातील कक्षात बोलावले.

मात्र, चर्चा करण्याऐवजी जगदीश लवाडिया व त्याच्यासोबत आलेल्या लोकांनी जबरदस्तीने प्रवेशद्वार उघडून कंपनीच्या परिसरात प्रवेश केला. स्थानिकांना रोजगार द्यावा, या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करीत गोंधळ घातला. यावेळी प्रकल्प व्यवस्थापक रॉय यांनी कंपनीचे काम सध्या सुरू असून स्थानिकांना रोजगार देताना प्राधान्य दिले जाईल, असे समजावून सांगितले. मात्र, उपस्थितांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही.

या घटनेत सहभागी असल्याचे कंपनीतील कर्मचाऱ्यांनी सांगितलेल्या व्यक्तींमध्ये मुरसा येथील जगदीश लवाडिया, राजकुमार पारशिवे, अक्षय डुडुरे, ज्योती आसमपल्लीवार, तेजू झोडे आणि चंद्रपूर तालुक्यातील शेनगाव येथील गौरव ठावरी यांचा समावेश आहे. कंपनीचे मनुष्यबळ व्यवस्थापक अश्विन नाईक ३९ यांच्या तक्रारीवरून घुग्घुस पोलिसांनी सहा नामनिर्देशित आरोपींसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.





  Print






Related Photos