अल्पवयीन पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस १० वर्षांचा सक्षम कारावास


- चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल; ₹५ हजार दंडाचीही शिक्षा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : अल्पवयीन पीडितेवर वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस चंद्रपूर येथील मा. जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांचा सक्षम कारावास आणि रु.५ हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीस अतिरिक्त एक महिन्याचा साधा कारावास भोगावा लागणार आहे. तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६ (II) अन्वये आरोपीस २ वर्षांचा सक्षम कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली.
पीडितेने आईकडे सांगितला प्रकार -
सदर घटना २८ फेब्रुवारी २०२३ रोजी उघडकीस आली. पीडितेच्या घराजवळ राहणारा आणि पीडिता ज्याला मामा म्हणत होती, त्या आरोपीकडून पीडितेवर वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्यात येत असल्याची बाब तपासात समोर आली. पीडितेच्या आईने तिच्याकडे विचारणा केल्यानंतर पीडितेने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी पीडितेवर लैंगिक अत्याचार झाल्याचे निदर्शनास आणून दिले. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक -
चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २०१/२०२३ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६(३), ३७६(२)(एन), ४५०, ५०६ तसेच पोक्सो कायदा २०१२ मधील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्परतेने आरोपीस अटक केली. त्यानंतर प्रकरणाचा सखोल तपास करण्यात आला.
वैद्यकीय व परिस्थितीजन्य पुरावे महत्त्वाचे -
तपासादरम्यान तपासी अधिकाऱ्यांनी प्रकरणाशी संबंधित साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल तसेच परिस्थितीजन्य पुरावे संकलित केले. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास पूर्ण करून निर्धारित वेळेत मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. पोलिसांनी केलेल्या तपासातील पुरावे आणि सरकार पक्षाने न्यायालयात मांडलेला युक्तिवाद यामुळे प्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली
न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल -
सदर खटल्याची सुनावणी पी. एम. गुप्ता, जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता ॲड. आसीफ शेख यांनी प्रभावी युक्तिवाद केला. सरकार पक्षाने सादर केलेले साक्षीपुरावे आणि इतर उपलब्ध पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरले. त्यानुसार २७ ऑगस्ट २०२६ रोजी मा. न्यायालयाने आरोपीस भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६(२)(एन) अन्वये १० वर्षांचा सक्षम कारावास आणि रु. ५ हजार दंड अशी शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीस एक महिन्याचा साधा कारावास भोगावा लागणार आहे. तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६ (II) अन्वये आरोपीस २ वर्षांचा सक्षम कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली.
तपास व न्यायालयीन पैरवी -
या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली आगलावे, पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर यांनी केला. सरकार पक्षातर्फे ॲड. आसीफ शेख यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. तपासावर पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके, पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर यांनी देखरेख केली. तर महिला पोलीस हवालदार किशोरी वामनराव गोंडे, ब.नं. २३७०, पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर यांनी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.
. अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई -
सदर प्रकरणातील तपास, पुरावे संकलन, दोषारोपपत्र दाखल करणे आणि न्यायालयीन पैरवीची संपूर्ण कार्यवाही मा. आयुष नोपाणी, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर; मा. ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर; तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. अल्पवयीन पीडितेवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी तत्परतेने गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. त्यानंतर पुराव्यांच्या आधारे सखोल तपास करून वेळेत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. प्रभावी तपास आणि न्यायालयीन पैरवीच्या परिणामी आरोपीस न्यायालयाकडून १० वर्षांच्या सक्षम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.




Petrol Price




