गडचिरोली शहरालगतच्या वनक्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यांवर वनविभागाची धडक कारवाई, दुचाकी वाहनेही केली जप्त


- सकाळीच वनविभागाने केलेल्या कारवाईने अतिक्रमणधारक धास्तावले
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
शहरालगतच्या कक्ष क्रमांक १७० मध्ये काही नागरिकांनी चुना, कापडी रिबीन बांधून अतिक्रमण करून जागेची आखणी केली. या बाबीची माहिती मिळताच आज ३ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक मोहिम राबवून अतिक्रमीत क्षेत्र नेस्तनाबूत केले आहे. अतिक्रमीत नागरिकांचे साहित्य तसेच दुचाकी वाहने, सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे अतिक्रमणधारक चांगलेच धास्तावले आहेत.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार १ ते ७ आॅक्टोबरदरम्यान वनविभागामार्फत वन्यजीव सप्ताह राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त असल्याची संधी साधून गोकुलनगर लगत असलेल्या कक्ष क्रमांक १७० मध्ये काही नागरिक झुडूपी जंगलाच्या परिसरात जागेची आखणी करीत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके यांच्या नेतृत्वात वनपरीक्षेत्र  अधिकारी डी.व्ही. कैलुके यांनी वनपरीक्षेत्रातील संपूर्ण कर्मचाऱ्यांना घेवून अतिक्रमीत क्षेत्रात धडक कारवाई राबविली. जागेवर कब्जा करण्यासाठी लावलेले रिबिन काढून टाकण्यात आले. घटनास्थळावर चुन्याने आखणी करीत असलेल्या लोकांकडून साहित्य हस्तगत केले. तसेच त्यांच्याकडील दुचाकी वाहने जप्त करून वनविभागाच्या वाहनाने वनविभागाच्या कार्यालयात जमा करण्यात आले. 
कारवाई राबविताना क्षेत्रसहाय्यक जेणेकर, काळे, हेमके, साखरकर, वनरक्षक कवडो, ठाकरे, राठोड, चव्हाण, मट्टामी, बोरकुटे, बोढे, भसारकर, धुर्वे, मुनघाटे, अलोणे, दुर्गे, लोणारे, धात्रक, कापकर, टोंगे, कोडाप, शिंदे, दुधबळे, गरफडे, डिकोंडावार, रायपुरे, मडावी, सयाम, दिगे व वनपरीक्षेत्रातील वनमजूर उपस्थित होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-03


Related Photos