छत्तीसगडमध्ये पोलीस - नक्षल चकमक : १७ जवान शहीद


- ४ ते ५ नक्षली ठार 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / सुकमा :
छत्तीसगड येथील सुकमा या नक्षलग्रस्त प्रदेशात गस्त घालणाऱ्या जवानांवर शनिवारी नक्षलवाद्यांनी हल्ला केला असू यात १७ जवान शहीद झाले  तर १४  जवान जखमी झाले आहेत.
शनिवारी दुपारी सुकमामधील चिंतागुफा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला चढवला. हे जवान शोध मोहिमेवरून परतत असताना हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात १४ जण जखमी झाले. जखमी जवानांना शनिवारी रात्री उशिरा एअरलिफ्ट करून रायपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. २०२० मधील हा सर्वाधिक मोठा हल्ला मानला जात आहे. या भागात शोधमोहीम राबवण्यासाठी सुमारे ३०० डीएआरजी आणि एसटीएफचे जवान तैनात होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमाराला जवानांना नक्षलवाद्यांनी घेरलं आणि हल्ला केला.
जवानांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं. सुमारे तीन तास चाललेल्या या चकमकीनंतर नक्षलवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले. त्यानंतर हे जवान आपल्या तळावर परतत असताना त्यांच्या तुकड्यांमधील १७ जवान शस्त्रासह बेपत्ता झाल्याचं लक्षात आलं. अतिशय प्रतिकूल वातावरण आणि सभोवताली घनदाट जंगल असल्याने या जवानांचा शोध घेण्यास अडचणी येत होत्या अखेर ते जवान शहीद झाल्याचे छत्तीसगढ पोलिसांकडून कळविण्यात आले आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, सुरक्षारक्षकांच्या टीमला नक्षलवाद्यांचा म्होरक्या हिडमा याच्या कॅम्पची माहिती मिळाली होती. यानंतर त्याच्या शोधासाठी हे जवान निघाले होते. दरम्यान, नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात पोलिसांनी ४ ते ५ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. असंही सांगितलं जात आहे की, हे नक्षलावादी बुलेट प्रुफ जॅकेट घालून आले होते. हिडमा देखील या चकमकीत जखमी झाला आहे.
  Print


News - World | Posted : 2020-03-22


Related Photos