हैदराबादमध्ये नग्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / हैदराबाद :
हैदराबादमधील दिशा बलात्कार घटनेनंतर राज्यात संतापाचा मोठा उद्रेक झाला होता. या घटनेचा चार महिन्यानंतरच पुन्हा एकदा तशाच प्रकारचा एक घृणास्पद प्रकार शहरात घडला आहे. हैदराबादमधील चेवेला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बोगद्यात महिलाचा नग्नावस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून त्यानंतरच तिच्यावर बलात्कार झाला आहे की नाही हे स्पष्ट होईल.
मृतदेह सापडलेल्या तरुणीची अद्याप ओळख पटलेली नसून पोलीस इतर ठाण्यातील बेपत्ता असल्याच्या तक्रारी तपासत आहेत. तसेच घटनास्थळाच्या आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेजदेखील तपासले जात आहेत. दरम्यान महिलेची हत्या चोरीसाठी झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 'महिलेच्या अंगावरील दागिने तसेच असून फक्त तिचे कपडे फाडण्यात आले आहेत. तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमी असून तिचे डोके दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली आहे.', असे पोलीस उपायुक्त रविेंदर रेड्डी यांनी सांगितले आहे. दरम्यान पोलिसांना तिची हत्या दुसऱ्याच ठिकाणी झाल्याचा देखील संशय आहे.
हैदराबादमध्ये २७ नोव्हेंबर २०१९ ला एका पशुवैद्यकीय डॉक्टरचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत पोलिसांना सापडला होता. डॉक्टर तरुणीवर चार नराधम आरोपींनी सामूहिक बलात्कार करून तिचा मृतदेह जाळला होता. त्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाचा उद्रेक झाला होता. त्याचदरम्यान हैदराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरमध्ये चार नराधमांचा खात्मा केला होता. या घटनेनंतर बलात्कार करणाऱया नराधमांना तत्काळ फासावर लटकवा अशी मागणी देशभरातून झाली होती. यादृष्टीने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी नवीन दिशा कायदा आणला आहे. या कायद्याअंतर्गत बलात्काराच्या गुन्हय़ातील दोषीला २१ दिवसांच्या आत फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील दिशा कायदा आणला जाणार आहे.

   Print


News - World | Posted : 2020-03-18


Related Photos