सहायक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांची संयुक्त कारवाई :जे पॅलेस बारवर दुसऱ्यांदा छापा, १२ जणांना पकडले, ५.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : गडचांदुर येथील गडचांदूर ते कोरपना मार्गावरील जे पॅलेस बारच्या दुसऱ्या मजल्यावरील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सहायक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांनी संयुक्त पथकासह धाड टाकली. १ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत १२ जणांना रंगेहात पकडण्यात आले. रोख रकमेसह मोबाईल, दुचाकी आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ५ लाख ७५ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, याच बारवर मागील आठवड्यातही पोलिसांनी छापा टाकला होता. त्यामुळे आठवडाभरात दुसऱ्यांदा कारवाई झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या कारवाईत शरद सुरेश जोगी (वय ४४), अशोक तुकाराम बोधे ४० वर्ष, मदन रघुजी बोरकर ६२ वर्ष, स्वप्नील भिमनाथ बोथले, जुनेद महेबुब शेख, महेशचंद कजोडीराम मीना ३८ वर्ष महेश रामकृष्ण पिंपळकर ४३ वर्ष, शाहरुख गफार खान ३० वर्ष, गुलाब एकरूप राठोड ४५ वर्ष, स्नेहल अशोक उईके ३० वर्ष, संदीप महादेव पाचभाई ४५ वर्ष आणि विनोद मनोहर काकडे ३५ वर्ष यांना ताब्यात घेण्यात आले. हे सर्व आरोपी गडचांदूर, नांदगाव सूर्या, वणसडी आणि सोनुर्ली परिसरातील रहिवासी आहेत. जे पॅलेस बारच्या दुसऱ्या मजल्यावरील हॉटेलमध्ये ५२ पत्त्यांच्या कॅटवर पैशांची बाजी लावून जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांनी राजुरा पोलीस स्टेशन, पोलीस उपअधीक्षक कार्यालय तसेच गडचांदूर पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदारांना सोबत घेऊन संयुक्त पथक तयार केले. त्यानंतर घटनास्थळी धाड टाकली असता १२ जण जुगार खेळताना आढळून आले.
पोलिसांनी आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून वैयक्तिक रोख रक्कम, डावावरील ४४ हजार ७० रुपये, स्टीलच्या डब्यातील १४ हजार ५०० रुपये, विविध कंपन्यांचे मोबाईल फोन, ५२ पत्त्यांचे कॅट, दोन मोटारसायकली आणि एक विनानंबर प्लेटची होंडा स्कूटी असा एकूण ५ लाख ७५ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.विशेष म्हणजे, जे पॅलेस बारवर मागील आठवड्यातही पोलिसांनी छापा टाकला होता. त्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्याने दुसऱ्यांदा कारवाई करण्यात आली. बारचे चालक एका राजकीय पक्षाशी संबंधित नेते असल्याची स्थानिक स्तरावर चर्चा आहे. त्यामुळे या बारवरील सलग पोलिसी कारवायांकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
ही कारवाई सहायक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश अनभुले यांच्यासह राजुरा पोलीस स्टेशन, पोलीस उपअधीक्षक कार्यालय राजुरा आणि गडचांदूर पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदार सहभागी होते. याप्रकरणी १२ जणांविरुद्ध जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ४ व ५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.




Petrol Price




