गडचिरोली जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट : मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यांचा इशारा


- विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता; शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात २८ ऑक्टोबर रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांनी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पावसासोबतच विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.
२९ ऑक्टोबरलाही वादळी पावसाचा अंदाज -
प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांनी जारी केलेल्या अंदाजानुसार, २८ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याबरोबरच ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
२९ ऑक्टोबर रोजीही जिल्ह्यातील एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, ३० ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी -
अचानक होणारा पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे शेतीतील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. शेतातील शेतीमाल, काढणी केलेली पिके आणि कृषी साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी. विजांचा कडकडाट सुरू असताना शेतात काम करणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन -
वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी झाडांखाली किंवा असुरक्षित ठिकाणी आश्रय घेणे टाळावे. हवामान प्रतिकूल असताना अनावश्यक प्रवास टाळावा तसेच प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. जिल्ह्यातील बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर नागरिक आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहून संभाव्य नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.




Petrol Price




