विषारी औषध प्राशन केल्यानंतर वृद्धाचा मृत्यू


- भंडारा जिल्ह्यातील घटना; उपचारादरम्यान साकोली तालुक्यातील न्याहारवानी येथील वृद्धाची प्राणज्योत मालवली
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : साकोली तालुक्यातील न्याहारवानी येथील बाबुराव आडकुजी मेश्राम ७३ वर्ष यांचा विषारी औषधाचे प्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना २३ ऑक्टोबर रोजी घडली. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील नोंद साकोली पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबुराव मेश्राम यांनी विषारी औषधाचे प्राशन केले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना पुढील उपचारांसाठी भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. भंडारा येथील रुग्णालयात त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. मात्र, डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती डॉक्टरांच्या लेखी मेमोद्वारे पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार भंडारा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. त्यानंतर हे प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी साकोली पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. साकोली पोलिस ठाण्यातही यासंदर्भात मर्ग नोंद करण्यात आली आहे. या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून नियमानुसार पुढील कार्यवाही केली जात आहे.




Petrol Price




