महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्ह्यातील २.५७ लाख बालकांना मिळणार जंतनाशक गोळी


- राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त २७ ऑक्टोबरला मोहीम; ३,८५३ केंद्रांवर ६,०६४ कर्मचारी तैनात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी, पोषणस्थिती उंचावण्यासाठी आणि जंतसंसर्गापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने २७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील तब्बल २ लाख ५६ हजार ७६२ बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने आवश्यक पूर्वतयारी केली आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी मोहिमेच्या नियोजनाचा आढावा घेतला. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची आढावा बैठक व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीला शिक्षण, महिला व बालविकास तसेच आदिवासी विकास प्रकल्पासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले.

जिल्ह्यात ३,८५३ केंद्रांवर होणार गोळ्यांचे वाटप -
राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेसाठी जिल्ह्यात एकूण ३,८५३ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये २,३२८ अंगणवाडी केंद्रे आणि १,७२७ शाळांचा समावेश आहे. या मोहिमेत २,०२९ नोडल शिक्षक, १,७०७ आशा स्वयंसेविका आणि २,३२८ अंगणवाडी सेविका असे एकूण ६,०६४ कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.

मोहिमेसाठी जिल्ह्यात ६ लाख ३ हजार अल्बेंडाझोल जंतनाशक गोळ्या उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रफुल्ल हुलके यांनी दिली. निश्चित केलेल्या केंद्रांमधून पात्र बालकांपर्यंत जंतनाशक उपचार पोहोचविण्यासाठी आरोग्य विभागाने व्यवस्था केली आहे.

वयोगटानुसार लाभार्थी बालकांची संख्या -
जिल्ह्यातील लाभार्थी बालकांची वयोगटानुसार नोंद पुढीलप्रमाणे आहे.

१ ते ६ वर्षे : १ लाख ३ हजार ७६८ बालके

६ ते १० वर्षे : ५४ हजार ४८७ बालके

१० ते १९ वर्षे : ९८ हजार ५०७ बालके

या तीन वयोगटांतील एकूण २ लाख ५६ हजार ७६२ बालकांना मोहिमेचा लाभ मिळणार आहे. लहान बालकांसाठी अंगणवाडी केंद्रांमधून, तर शालेय वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी शाळांच्या माध्यमातून आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.

जंतसंसर्गामुळे कुपोषण आणि रक्तक्षयाचा धोका -
दूषित मातीच्या संपर्कात येणे आणि अस्वच्छतेमुळे बालकांमध्ये जंतसंसर्ग होण्याची शक्यता असते. जंतसंसर्गामुळे शरीरातील पोषक घटकांचे शोषण बाधित होऊ शकते. परिणामी कुपोषण, अशक्तपणा, रक्तक्षय आणि पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे बालकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी जंतनाशक उपचारांसोबत वैयक्तिक स्वच्छता आणि परिसराच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व पात्र बालकांना जंतनाशक गोळी देण्यासाठी पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना संबंधित केंद्रावर पाठवून मोहिमेचा लाभ घ्यावा. तसेच गोळी देताना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.





  Print






Related Photos