महिलांनी मोबाईलचा वापर काळजीपूर्वकच करावा : नगराध्यक्षा योगिता पिपरे


- सायबर गुन्हे आणि महिला सुरक्षा कार्यशाळेत गडचिरोली नगराध्यक्षा यांचे प्रतिपादन 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
सायबर विभाग व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सायबर गुन्हे आणि महिला सुरक्षा या विषयावर गडचिरोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षा योगिता पिपरे यांनी मार्गदर्शन केले. शासकीय विज्ञान महाविद्यालयात 250 विद्यार्थीनींना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, महिलांनी मोबाईलचा अतिरेक टाळवा, इंटरनेटचा वापर गरजेपुरताच करुन त्याबाबत आवश्यक ती काळजी घ्यावी. यावेळी कार्यशाळेचे प्रमुख वक्ते सायबर विभाग गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक अजित राठोड, प्रमुख अतिथी जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसुळ, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली बांबोळे, विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हेमलता चौधरी उपस्थित होते.
मार्गदर्शनात अजित राठोड यांनी महिलांवरील सायबर गुन्हयांचे प्रकार, त्याबाबत तक्रारी करण्याच्या पद्धती, सायबर गुन्हयांबाबत असलेले कायदे याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, महिलांवरील अत्याचारामध्ये सायबर गुन्हे वाढत आहेत. महिलांची गोपनीयता व ओळख मिळविण्याचे प्रकार सोशल मीडियावर मोठया प्रमाणात होत असतात. यातून खाजगी छायचित्र, व्हिडिओ, माहिती काही व्यक्तींकडून सूडाच्या भावनेने किंवा गंमत म्हणून सार्वजनिक केली जाते. यावेळी सहज केलेल्या अशा कृत्यामधून महिलांवर अत्याचार होतात, त्यांचे छळ होतात. अशा घटना घडू नयेत म्हणून महिलांनी आवश्यकते नुसार खाजगी माहिती जपून ठेवावी. जर अत्याचार घडत असतील तर गप्प न बसता त्याबाबत पोलीस विभागाकडे तक्रार करा. याबाबत महिलांच्या नावाची गोपनीयता ठेवली पोलीस विभागाकडू ठेवली जाते.
या कार्यशाळेत जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी महिला अत्याचार व सायबर गुन्हे याबाबत विविध विविध उदाहरणे देवून त्यांचे गांभिर्य सांगितले. तर सामाजिक कार्यकर्त्या वैशाली बांबोळे यांनी महिलांबाबत होणाऱ्या हिंसा व त्याबाबत घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्या हेमलता चौधरी यांनी मुलींनी शैक्षणिक जीवनात सोशल मिडीयाच्या आहारी जावू नये असा सल्ला दिला. 
 कार्यक्रमामध्ये सायबर विभागाच्या पायल टेंबुर्णे, गणेश मोहिते तर महिला तक्रार निवारण कक्षाचे सहा.उपनिरीक्षक खुशाल गेडाम इत्यादी पोलीस अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.राऊत यांनी मानले.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-01-03


Related Photos