राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवण्याची मराठी एकीकरण समितीची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
  राज्यात सत्तास्थापनेचा पेच आणखी वाढला आहे. महाराष्ट्रातील एकूणच राजकीय घडामोडी आणि सत्ता स्थापनेचा प्रकार पाहता मूळचे भाजपाचे असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आता या सर्व समस्यांना कारणीभूत ठरवले जाऊ लागले आहे.
मराठी एकीकरण समितीने आज आक्रमक पवित्र घेतला असून थेट राज्यपालांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. जनतेचा संविधान, लोकशाहीवरचा विश्वास कायम ठेवायचा असेल तर राष्ट्रपती व राज्यपाल या पदावरील व्यक्ती निष्पक्ष असावी व याची स्वत:हून राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाने दखल घ्यावी, अशी विनंती समितीने केली आहे. 
मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख, प्रदीप सामंत आदी प्रमुखांनी एकूणच सत्ता स्थापनेसाठी घडलेल्या प्रकाराचा निषेध करत ही मागणी केली आहे. समितीने राज्यपाल कोशयारी हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असून भाजपाचे ते राष्ट्रीय उपाध्यक्ष राहिले आहेत. शिवाय भाजपाच्या तिकिटावर ते निवडणुका जिंकलेले आहेत. तशी माहितीच राजभवनाच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यपाल कोशयारी यांची भूमिका ही पक्षपातीपणाची आहे हे एकूणच सर्व घडामोडींवरून दिसतेय,असे समितीने म्हटले आहे.
दरम्यान, भाजपानं सरकार स्थापन करून सर्वांना चकित केलं. या घटनेनंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं थेट सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं. या याचिकेवर काल सुनावणी झाली असून, आज सत्तास्थापनेच्या निर्णयासंदर्भातील कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली. यावर युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयानं निर्णय राखून ठेवला आहे. यासंदर्भात न्यायालय उद्या निर्णय देणार आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2019-11-25


Related Photos