पेट्रोल टँकमध्ये तयार केले गुप्त कप्पे! चंद्रपूरहून गडचिरोलीत दारू आणणारे तस्कर जेरबंद


- दोन दुचाकींसह २ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : दुचाकी वाहनांच्या रचनेत बदल करून पेट्रोल टँक आणि सीटच्या आत विशेष गुप्त कप्पे बनवत छुप्या पद्धतीने अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोन तस्करांचा गडचिरोली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गडचिरोली ते चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीजवळ रविवारी (१८ ऑक्टोबर) पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान ही कारवाई केली. या कारवाईत दोन दुचाकींसह एकूण २ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तानाजी नानाजी पेंदोरकर (वय ३२) आणि सौरभ प्रकाश महाजनवार (वय १९, दोघेही रा. व्याहाड बु., ता. सावली, जि. चंद्रपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी असल्याने शेजारील चंद्रपूर जिल्ह्यातून विविध युक्त्या वापरून अवैध दारू आणण्याचा प्रयत्न तस्करांकडून केला जातो. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी अवैध दारू विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. रविवारी गडचिरोली पोलीस ठाण्याचे पथक वैनगंगा नदीजवळ नाकाबंदी करत असताना, गोपनिय बातमीदाराकडून माहिती मिळाली की तानाजी पेंदोरकर हा दुचाकीने अवैध देशी-विदेशी दारूची वाहतूक करणार आहे.
त्यानुसार पोलीस पथकाने पाळत ठेवून संशयितरीत्या भरधाव वेगाने येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना हात दाखवून थांबवले. विचारपूस केल्यानंतर पंचांसमक्ष वाहनांची पाहणी केली असता, दोन्ही दुचाकींच्या (क्र. MH ३४ AE ८८६५ आणि निळ्या रंगाची पल्सर क्र. MH ३४ AX ९८०९) पेट्रोल टँक व सीटच्या आत तयार केलेल्या गुप्त कप्प्यांमध्ये दारू लपवल्याचे उघडकीस आले.
या वाहनांमधून ९० एमएल क्षमतेच्या रॉकेट संत्रा देशी दारूच्या ४०० निपा (किंमत ३२,००० रुपये) जप्त करण्यात आल्या. तसेच वाहतुकीसाठी वापरलेल्या २ लाख रुपये किमतीच्या दोन दुचाकी असा एकूण २ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस ठाणे गडचिरोली येथे कलम ६५ (अ), ८३ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये (अप क्र. १५६६/२०२६) गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
गडचिरोली जिल्ह्याच्या सीमांवर २४ तास नाकाबंदी राबविण्यात येत असून त्या माध्यमातून अवैध व्यवसायांवर प्रभावीपणे आळा घातला जात आहे. - एम. रमेश, पोलीस अधीक्षक, गडचिरोली
सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी., प्रभारी सहायक पोलीस अधीक्षक सुयश सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण व त्यांच्या पथकाने पार पाडली.




Petrol Price




