नुकसानीचा पंचनामा झाला नसेल तर काळजी करू नका, नुकसानीचे फोटोही ग्राह्य धरले जातील


- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेतकऱ्यांना दिलासा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 प्रतिनिधी / मुंबई :
परतीच्या पावसाने पीकहानी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीकहानीचे पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. नुकसानीचा पंचनामा झाला नसेल तर काळजी करू नका, नुकसानीचे फोटोही गाह्य धरले जातील, असे सांगून विम्यासाठी सरकारी पंचनामे गाह्य धरण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. शेतकऱ्यांना  वेळीच मदत दिली जाईल, अशी ग्वाही पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी दिली.
 राज्यात पावसाने झालेले नुकसान आणि राज्य सरकारच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या उपाययोजना याचा सविस्तर आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी घेतला. राज्याचे मुख्य सचिव, कृषी, मदत व पुनर्वसन, वित्त आणि विविध विभागांचे सचिव, भारतीय हवामान विभागाचे अधिकारी तसेच विमा कंपन्यांचे अधिकारी या बैठकीला हजर होते. राज्यात सत्ता स्थापनेवरून शिवसेना-भाजपमध्ये गोंधळ सुरु असताना मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गुरुवारी राज्यपालांनीदेखील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करून राज्यातील परिस्थितीबाबत अवगत केले होते. त्यानंतर केंद्रीय पथकाला राज्यात पाहणीसाठी पाठविण्याचा निर्णय झाला होता.
मावळते ठरत असलेले व पुन्हा सत्तेवर येण्याचीच शक्यता अधिक असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मुख्यसचिवांसह विविध खात्यांच्या सचिवांची तातडीने बैठक बोलावून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला विभागीय आयुक्त आणि पीकहानी झालेल्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारीदेखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या सहाय्याने हजर होते. राज्यात सुमारे ३२५ तालुक्यांमधील ५४ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधीत झाली असून, ज्वारी, मका, धान, तूर, कापूस, सोयाबीन आणि फळपिके यांचे नुकसान झालेले आहे. प्रभावित भागांचे तत्काळ ड्रोन सर्वेक्षण करण्याचे आदेश याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी दिले. एका सुपर सायक्लॉनसह चार वादळे अरबी समुद्रात तयार झाली होती. त्यामुळे हा पाऊस झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगून, या पावसाची तीव्रता ऑक्टोबरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात अधिक होती, असे सांगितले. पीकहानीचा पुरावा म्हणून स्थानिक गावकरी यांनी नुकसानीचा काढलेला फोटोसुद्धा ग्राह्य धरा असे आदेश याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसह कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेत. प्रशासनाने ही परिस्थिती संपूर्ण संवेदनशीलतेने आणि सर्वोच्च प्राधान्याने हाताळावी. प्रत्येक शेतकऱ्यांची समस्या एकूण घेतली जाईल, यासाठी दुष्काळाच्या काळात उभारली तशी यंत्रणा उभारावी, व्हॉटसअप क्रमांकदेखील संपर्कासाठी उपलब्ध करून द्यावेत, असे आदेशही याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी दिले.
 राज्य सरकार संपूर्णपणे स्थितीवर लक्ष ठेऊन असून, पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन स्थितीचे अवलोकन करावे, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शनिवारी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठकसुद्धा बोलाविण्यात आल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
  Print


News - Rajy | Posted : 2019-11-02


Related Photos