महत्वाच्या बातम्या

 उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : 08 वर्धा लोकसभा मतदार संघासाठी 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार असून भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार उमेदवारांनी मतदानापुर्वी तसेच मतदानानंतर करावयाची कार्यवाही यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

निवडणुकीचा प्रचार 24 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता संपला असून प्रचार संपताच प्रचाराकरिता लावलेले होर्डिंग, बॅनर्स स्वत:हून काढवेत. मतदान केंद्राध्यक्षाकडे मतदानाच्या आदल्या दिवशी जाऊन मतदान प्रतिनिधी (पोलींग एजेंट) चा नमुना भरुन घेता येईल. 25 एप्रिल 2024 रोजी सर्व मतदान पथके नियोजित मतदान केंद्रावर पोहचतील.

मतदानाच्या दिवशी केंद्रावर सकाळी 5.30 वाजता अभिरुप मतदान घेतले जाईल. त्यावेळी उमेदवारांनी मतदान प्रतिनिधींना मतदान केंद्रावर उपस्थित ठेवावे. तसचे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना त्यांचा निवडणूक बुथ मतदान केंद्रापासून 200 मीटर पलिकडे एक टेबल व दोन खुर्च्या आणि ऊन व पावसापासून संरक्षणासाठी छत्री, ताडपत्रीसह उभारण्यास परवानगी असणार आहे.

मतदान संपल्यानंतर विविध मतदान केंद्रावरून सिलबंद मतदान यंत्रे नियोजित गाडीने संबंधित विधानसभा मतदार संघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा केली जातील. त्यांनतर त्यांच्याकडील सर्व मतदानासंबंधी निवडणुकीचे कागदपत्रांची तपासणी केली जाईल. त्यांनतर विधानसभा निहाय सिलबंद मतदान यंत्रे जिल्हा स्तरावरील भारतीय खाद्य निगम, बरबडी रोड, वर्धा येथील गोदाम क्रमांक 21 येथे सुरक्षितरित्या जतन करण्यात येणार आहे. संपूर्ण सहाही विधानसभा मतदार संघातील मतदान यंत्रे जमा झाल्यानंतर सुरक्षा कक्ष सिल करण्यात येईल यावेळी उमेदवार अथवा प्रतिनिधींनी उपस्थित रहावे.

मतदान यंत्रासोबत प्राप्त होणाऱ्या सांविधीक व असांविधीक लिफाफ्यांच्या पेट्या वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या माळ्यावर तयार करण्यात आलेल्या सुरक्षा कक्षात ठेवण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांना सुरक्षा कक्षाचे पोलीस सुरक्षेच्या बाहेरील कक्षातून सुरक्षा कक्षाची तपासणी करता येईल.

लिफाफ्यांमधिल मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी निवडणूक निरीक्षक 27 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजता तपासतील त्यावेळी उमेदवार अथवा प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos