गडचिरोलीत १८ फेऱ्या तर आरमोरी, अहेरी विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी २१ फेऱ्यांमध्ये मतमोजणी


- जिल्ह्यात मतमोजणीची तयारी पूर्ण
- आरमोरी व अहेरी साठी १४ - १४ टेबल तर गडचिरोलीमध्ये २० टेबल वर होणार मतमोजणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०१९ साठी २१ ऑक्टोबर रोजी जिल्हयात ७१.१३  टक्के मतदान मतपेटीत मतदारांनी टाकले. जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रात २४ ऑक्टोबर रोजी त्या त्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली असून याकरीता २५० हून अधिक अधिकारी - कर्मचारी यांची नेमणूक केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदार संघ असून या मतदार संघाची मतमोजणी उद्या २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता संबंधित मतदार संघाचे निवडणूक निरिक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सुक्ष्म निरिक्षक यांच्या उपस्थितीत होणार आहे. प्रत्येक मतदार संघाची मतमोजणी त्या त्याठिकाणी एकाचवेळी सुरु करण्यात येणार आहे. प्रत्येक मतदार संघासाठी एक मतमोजणी निरीक्षक, त्यांच्या अधिनस्त सूक्ष्म निरीक्षकही मतमोजणीवर लक्ष ठेवून असणार आहे. 
सकाळी ८ वा सर्वप्रथम पोस्टल मतमोजणीने सुरवात होणार असून त्यानंतर मतदान केंद्र निहाय ईव्हीएमची मतमोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर एका निश्चित केलेल्या टेबलवर रँडमली निवड केलेल्या पाच व्हीव्हीपॅटमधील चिठ्यांचीही मतमोजणी करण्यात येणार आहे. याकरीता १० टक्के कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, सहायक, सूक्ष्म निरीक्षक, शिपाई याप्रमाणे कर्मचारी असणार आहे. 

विधानसभा क्षेत्रनिहाय मतमोजणी फेऱ्या- आरमोरी विधानसभा मतदार संघ २१ फेऱ्या, गडचिरोली १८ फेऱ्या तर अहेरी २१ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होणार आहे. 
विधानसभा क्षेत्रनिहाय मतमोजणी ठिकाणे  - आरमोरी येथे तहसिल कार्यालय, देसाईगंज, गडचिरोली येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये तर अहेरी याठिकाणी  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागेपल्ली येथे होणार आहे. 
 मतमोजणीसाठी नेमण्यात आलेल्या पर्यवेक्षक व सहाय्यक यांचे पहिले प्रशिक्षण पूर्ण झाले असून दुसरे प्रशिक्षण आज २३ ऑक्टोबर रोजी घेण्यात आले. प्रशिक्षणानंतर मतमोजणीसाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी यांची सरमिसळ करुन कोणाला कोणत्या मतदार संघात मतमोजणीसाठी पाठविण्याचे याचे आदेश संबंधितांना देवून त्यांना लगेचच मतमोजणी केंद्राकडे रवाना करण्यात आले असल्याची माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना निळ-ठुबे यांनी दिली आहे. मतमोजणी सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी सर्व मतदानकेंद्राच्या परिसरात पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-23


Related Photos