महत्वाच्या बातम्या

 चारा बाहेरच्या जिल्ह्यात वाहतूक करण्यास चार महीने बंदी : प्रशासनाचा निर्णय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / जालना : यंदा सर्वत्र चारा आणि टंचाई गंभीर रूप घेत असून यातच आता जालना जिल्ह्यात चाऱ्याची टंचाई भासू नये यासाठी जालना जिल्ह्यातील चारा इतर जिल्ह्यांत वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याविषयी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी निर्णय जाहीर केला आहे.

याविषयी पोलिस प्रशासन, जिल्हा परिषदेचा पशुधन विभाग आणि आरटीओ अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. ४ एप्रिल रोजी हे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता चारा जिल्ह्याबाहेर नेता येणार नाही.

चाऱ्याची टंचाई : 
मागील वर्षी कमी पावसामुळे यंदा जिल्ह्यात चाऱ्याचे उत्पादन घटले आहे. यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न येत्या काही दिवसात गंभीर होण्याची शक्यता आहे. चाराटंचाईची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून कृषी विभागामार्फत बियाणे वाटप करण्यात आले आहे. मे महिन्यात या चाऱ्याची उगवण होणार आहे. पशुपालकांना चाऱ्यासाठी भटकंती करावी लागू नये यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. प्रशासनाकडून चाऱ्याच्या इतर जिल्ह्यांतील वाहतुकीवर बंधने आली आहेत.

जिल्ह्यात ५ लाख जनावरे : 
जालना जिल्ह्यात ५ लाख ३ हजार ७२ पशुधनाची नोंद आहे. तसेच शेळ्या-मेंढ्यांची संख्या ३ लाख २४ हजार ३१३ एवढी आहे. यामुळे पशुधनासाठी प्रतिदिन चाऱ्याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यामुळे जिल्ह्यात उत्पादित झालेला चारा अपुरा पडू नये यासाठी जालना जिल्ह्याबाहेर चाऱ्याची वाहतूक करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.

४ महिन्यासाठी निर्णय : 
जालना जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा, मुरघास आणि जनावरांसाठी असलेले टोटल मिक्स रेशनची राज्यातील इतर जिल्ह्यांत वाहतूक करण्यास निर्बंध लादण्यात आलेले आहेत. पुढील चार महिन्यांसाठी हा नियम लागू असणार आहे. येत्या जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर जिल्ह्यात चारा मुबलक उपलब्ध झाल्यानंतर या नियमात बदल होण्याची शक्यता आहे.





  Print






News - Rajy




Related Photos