महत्वाच्या बातम्या

 महाराष्ट्राच्या आरमाराचा प्रवास गुजरातमध्ये उलगडणार : मेरीटाइम हेरिटेज कॉम्प्लेक्समध्ये दालन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : केंद्र शासनाच्या बंदरे, जहाज आणि जलपरिवहन मंत्रालयाकडून गुजरात येथील लोथल या ठिकाणी नॅशनल मेरीटाइम हेरिटेज कॉम्प्लेक्स तयार करण्यात येणार आहे. यात देशाच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सागरी वारसा प्रदर्शित करण्यात येणार असून, यासाठी प्रत्येक राज्याचे स्वतंत्र दालन असणार आहे.

महाराष्ट्राच्या दालनात आरमाराचा इतिहास आणि प्रवास उलगडणार आहे. या दालनाच्या उभारणीसाठी केंद्रीय बंदरे विभागाकडून ३९ कोटी ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याला नुकतीच राज्य शासनाने वित्तीय मान्यता दिली आहे.

महाराष्ट्राच्या स्वतंत्र दालनाचे काम राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग पाहणार आहे. महाराष्ट्राच्या या दालनात सागरी वारसासंदर्भातील ऐतिहासिक माहिती, त्याविषयी ध्वनी चित्रफीत, इतिहास, सद्यस्थिती, दुर्मीळ छायाचित्रे अशा विविध गोष्टींचा समावेश असणार आहे. तसेच या संदर्भात अभ्यासात्मक वा संशोधनात्मक दृष्टीने जाणून घेणाऱ्यांसाठी विशेष कक्ष असणार आहे.

या दालनाच्या माध्यमातून पहिल्यांदाच राज्याचा सागरी वारसा सर्वसमावेशकपणे सर्वासमोर उलगडण्यात येणार आहे.

मर्यादेपेक्षा अधिक खर्च टाळा -

१) दालनासाठी देण्यात येणारा निधी पहिल्या टप्प्यात इंडियन पोर्ट रेल ॲण्ड रोपवे कॉर्पोरेशन लिमिटेड यांना अंशदान स्वरूपात वर्ग करणार आहे.

२) या दालनाच्या प्रकल्पाकरिता राज्याच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या संचालक यांना नियंत्रणाची जबाबदारी दिली आहे.

३) केंद्राकडून दालनासाठी मिळालेल्या निधीच्या मर्यादेपेक्षा अधिक खर्च होणार नाही तसेच निधीतील रक्कम शिल्लक राहिल्यास ती शासनाकडे त्वरित वर्ग करण्यात यावी, असेही शासन निर्णयात स्पष्ट केले आहे.





  Print






News - Rajy




Related Photos