महत्वाच्या बातम्या

 आचारसंहिता काळात शासकीय परिसरात मिरवणुका, घोषणा व सभा आयोजनास निर्बंध


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात मिरवणुका काढणे, घोषणा तसेच सभा घेण्यास निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केले आहेत. हे आदेश ६ जूनपर्यंत अंमलात राहणार आहेत.   

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी निवडणूक कार्यक्रम १६ मार्च रोजी घोषित केला आहे. निवडणुक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातुन जिल्हादंडाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने सभा घेणे, आवाराचा वापर राजकीय कामासाठी करणे किंवा रॅली काढणे, निवडणुकीसंदर्भातील पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट, पेंटिंग्स, होर्डिंग्स लावणे, निवडणूक विषयक घोषवाक्य लिहिणे, आवारात निवडणूकविषयक घोषणा देणे किंवा मतदाराला प्रलोभन दाखविणे तसेच निवडणुकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृती करण्यास निर्बंध घालण्यात आले आहे.

फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये निवडणुक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ६ जूनपर्यंत निर्बंध घालण्यात आले असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.





  Print






News - Nagpur




Related Photos