दारूबंदीचे समर्थन न करणारा आणि स्वतः दारू पिणारा उमेदवार चालणार नाही


- १२० ग्रामपंचायत अंतर्गत २८७ गावांचे राजकीय पक्षांना आवाहन
- ग्रामसभांमध्ये केला प्रस्ताव
- सर्चचे संस्थापक डाॅ. अभय बंग यांची पत्रकार परिषदेतून माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
लोकसभा निवडणूक मुक्तीपथच्या माध्यमातून दारूमुक्त पार पडली. याच धर्तीवर आता गावे स्वयंस्फूर्तीने विधानसभा निवडणूक दारूमुक्त पार पाडण्यासाठी सरसावले आहेत. आता विधानसभा निवडणूकीत राजकीय पक्षांचे उमेदवार अद्याप जाहिर झालेले नाहीत. मात्र निवडणूकीच्या रिंगणात उतरविणार उमेदवार दारूबंदीचा समर्थक असावा, स्वतः दारू पिणारा नसावा आणि दारू वाटप करणारा नसावा, असा प्रस्ताव जिल्ह्यातील १२० ग्रामपंचायत अंतर्गत २८७ ग्रामसभांनी पारीत केला आहे. हा प्रस्ताव सर्व राजकीय पक्षांचे प्रदेश अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांना पाठविला आहे, अशी माहिती सर्च संस्था आणि मुक्तीपथचे डाॅ. अभय बंग यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे. पत्रकार परिषदेला मुक्तीपथचे जिल्हा संयोजक डाॅ.मयुर गुप्ता उपस्थित होते.
डाॅ. अभय बंग म्हणाले, जिल्ह्यात २२ वर्षांपासून दारूबंदी आहे. मागील तीन वर्षांपासून मुक्तीपथ अभियान सुरू आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील ६०० गावांनी सामुहिक निर्णयाने गावात दारूबंदी केली आहे. आता २१ ऑक्टोबर रोजी विधानसभेची निवडणूक आहे. यामुळे मतदारांना दारू, पैशांचे आमिष दाखविले जाते.  यामुळे निवडणूक काळात दारूबंदीचा फज्जा उडतो. यासाठी मुक्तीपथच्या माध्यमातून गावांमध्ये जनजागृती करण्यात आली. यामुळे गावांनी स्वयंस्फूर्तीने तीन मुद्दे ग्रामसभेत घेवून प्रस्ताव राजकीय पक्षांना पाठविला आहे. मतदारांनी दारूच्या नशेत मतदान करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. 
लोकसभा निवडणूकीत सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपण मतदारांना दारूचे वाटप करणार नाही, असे प्रतिज्ञापत्र लिहून दिले होते. आता दारू न पिणार्या उमेदवारालाच मतदान करू, असा निर्णय मतदारांनीच घेतला आहे. यामुळे राजकीय पक्षांनी जनभावनेचा विचार करावा, असेही डाॅ. अभय बंग म्हणाले.

मतदानाचा दिवस म्हणजे लोकशाहीच्या विजयाचा दिवस 

मतदानाचा दिवस हा लोकशाहीचा विजयाचा दिवस असतो, आनंदाचा दिवस असतो. यामुळे मतदारांनी कोणत्याही उमेदवाराकडून दारू स्वीकारून मतदान करू नये. उमेदवारांनीही दारूचे वाटप करू नये. भारतीय घटनेमध्येसुध्दा अशी मार्गदर्शक तत्वे ठरविण्यात आली आहेत. यामुळे जनतेने अवलंबलेल्या अहिंसक कृतीचा राजकीय पक्षांनी स्वीकार करावा. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील जनतेप्रमाणे राज्यातील जनतेनेही या कृतीचे अनुकरण करावे, असेही आवाहन डाॅ. अभय बंग यांनी केले आहे.

‘जो पाजील नवऱ्याला दारू, त्याला नक्कीच पाडू’

लोकसभा निवडणूकीत ‘जो पाजील नवऱ्याला दारू, त्याला नक्कीच पाडू’ या आशयाच्या फलकाची सर्वत्र चर्चा होती. येत्या विधानसभा निवडणूकीतही हे फलक पहायला मिळत आहेत. मुक्तीपथच्या वतीने व्यापक जनजागृती केली जात असून तसे फलक सर्वत्र लावण्यात आले आहेत. ‘दोन पैशांची दारू घेउन आपले अमुल्य मत देउ नका’, दारू पिउन मतदान करू नका अशाप्रकारचे फलक लावण्यात आले आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-30


Related Photos