गडचिरोली विधानसभा क्षेत्र सापडलाय खड्ड्यात!


- खड्डेमुक्त महाराष्ट्राचा फज्जा
- वाहने फसताहेत मुख्य रस्त्यावर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
राज्याचे बांधकाम मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी खड्डेमुक्त महाराष्ट्र ची घोषणा केली होती. संपूर्ण महाराष्ट्र खड्डेमुक्त झाला की नाही माहिती नाही मात्र गडचिरोली विधानसभा क्षेत्रात अख्ख्या महाराष्ट्रातील रस्त्यांवरील खड्डे पडल्याचे चित्र सध्या येथील जनतेला पहावयास मिळत आहे. यामुळे गडचिरोली विधानसभा क्षेत्र सापडलाय खड्ड्यात अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
संपूर्ण गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. या मार्गांवरून विद्यमान लोकप्रतिनिधी फिरतात. विद्यमान आमदारांची विकास यात्राही याच मार्गावरून निघाली.  पण त्यांना या रस्त्यांचा जरासाही त्रास होतो की नाही हे त्यांनाच माहित. देसाईगंज - आरमोरी - गडचिरोली - चामोर्शी - आष्टी - आलापल्ली - सिरोंचा हा महामार्ग म्हणजे जिल्ह्याचा आत्मा. गडचिरोली ते आष्टी या मार्गाने अनेक राज्यातून येणारी वाहने आवागमन करतात. मात्र या मार्गाची एवढी दयनिय अवस्था झाली आहे की, मुख्य मार्गावरच वाहने फसत आहेत. यामुळे वाहनधारकांना वाहन न्यायचे तरी कुठून असा प्रश्न पडला आहे. गडचिरोली शहरात चामोर्शी मार्ग तर नसल्यातच जमा झाले आहे. विद्यमान खासदारांचे कार्यालय तसेच भाजपाने आता नव्यानेच निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेले वार रूम याच मार्गावर आहे. या परिसरात तर मोठमोठे खड्डे आहेत. या खड्ड्यांमध्ये पाउस येत नसतानाही तलावासारखे पाणी साचून राहते. यामुळे दुचाकी व चारचाही वाहनधारकांची चांगलीच तारांबळ होत आहे. 
गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार दररोज याच मार्गाने प्रवास करतात. मात्र त्यांनाही या खड्ड्यांचा काहीच त्रास होत नसावा. यामुळेच त्यांचे या खड्ड्यांकडे लक्ष जात नसावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्ड्यांमध्ये काही मटेरीयल टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला. मात्र उलट खड्डे मोठेच बनत गेले. आता टाकलेले साहित्य खड्ड्यांमधून बाहेर पडून उलट वाहनधारकांनाच त्रास होत आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम होणार असून हा मार्ग सिमेंट काॅंक्रीटचा होणार असे सांगितल्या जात आहे. मात्र ज्या महामार्गाचे काम सुरू आहे त्यांचेच काम इतके कासवगतीने आहेत की, त्यांचेच काम पूर्ण व्हायला किती वर्ष लागतील हे सांगता येणार नाही. यामुळे आणखी किती दिवस नागरीकांनी खड्ड्यांतून प्रवास करावा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सुदैवाने या मार्गावरून मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा गेली नाही. नाहीतर त्यांना या खड्ड्यांचा नक्कीच त्रास जाणवला असता. यामुळे विकास सुरू असलेल्या मार्गावरूनच महाजनादेश यात्रा चंद्रपूर जिल्ह्यात पाठविण्यात आली असावी, अशी चर्चा समाज माध्यमांवर सुरू आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांबाबत रोज नवनवीन किस्से समाज माध्यमांवर वाचायला मिळत आहेत. चर्चेसोबतच खड्डे मोठे होत आहेत. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला याचे काहीही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-19


Related Photos