महत्वाच्या बातम्या

 आमदार व जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जाणता राजा च्या तयारीचा आढावा


- ३५० वा शिवराज्यभिषेकानिमित्त आयोजन

- प्रवेश मोफत, मात्र प्रवेशिका आवश्यक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनाच्यावतीने शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित जाणता राजा महानाटयाचा प्रयोग होणार आहे. ६ ते ८ फेब्रुवारी या कालवाधीत स्वावलंबी मैदान, रामनगर येथे आयोजित महानाट्याच्या तयारीला वेग आला आहे. महानाट्याच्या तयारीचा आमदार पंकज भोयर व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, तहसीलदार रमेश कोळपे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जाणता राजा महानाट्यात प्रवेश निशुल्क असल्यामुळे नागरिकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता सुक्ष्म नियोजन करण्यात यावे. दिव्यांग बांधवांसाठी बसण्याची विशेष व्यवस्था करण्यात यावी. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पार्किंगचे पोलिस विभागाने नियोजन करावे. कार्यक्रमामध्ये स्वयंसेवक, होमगार्ड आदींची मदत घ्यावी, अशा सूचना यावेळी आमदार पंकज भोयर यांनी दिल्या.

तीन दिवशीय महानाट्याचे उद्घाटन ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० स्वावलंबी विद्यालय मैदान, रामनगर येथे होईल. उद्घाटन कार्यक्रमास पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. रामदास तडस, आ.रामदास आंबटकर, आ. अभिजित वंजारी, आ. सुधाकर आडबाले, आ. रणजित कांबळे, आ. दादाराव केचे, आ. समीर कुणावार, आ.डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले उपस्थित राहणार आहे.

शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंग जाणता राजा मध्ये दाखविण्यात येणार आहे. दररोज सायंकाळी ५.३० वाजता नंतर या प्रयोगाला सुरुवात होईल. नागरिकांना प्रवेश मोफत असून प्रवेशिकेद्वारे प्रवेश मिळणार आहे. प्रवेशिका नवीन जिल्हाधिकारी कार्यालय तसेच नगर परिषद कार्यालयामध्ये मिळणार आहे. महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच नागरिकांनी सहकुटुंब प्रयोग बघावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos