महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्यांनी वखार महामंडळाच्या गोदामात शेतमालाची साठवणूक करुन सोयी-सुविधांचा लाभ घ्यावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : वखार महामंडळाद्वारे शेतकऱ्यांना शेतमाल तसेच शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, कीटकनाशके यांची शास्त्रोक्त पद्धतीने सुरक्षित साठवणूक करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

महामंडळाची मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद व लातूर हे ८ विभाग आहेत. राज्यातील महामंडळाची एकूण २०५ वखार केंद्रावर १ हजार १७३ गोदामांची साठवणूक क्षमता २०.४० मे.टन आहे. नागपूर विभागातंर्गत भंडारा जिल्ह्यात तुमसर, चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी, पडोली, चंद्रपूर (औ) व वरोरा, गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली व वडसा, गोंदिया जिल्ह्यात आमगाव व अर्जुनी (मोरगाव), नागपूर जिल्ह्यात वाडी-हिंगणा, बुट्टीबोरी, काटोल व सावनेर तसेच वर्धा जिल्ह्यात आर्वी, हिंगणघाट, कारंजा (घाडगे), वर्धा (शिवनगर) आणि वर्धा (औ) या ६ जिल्ह्यात एकूण १८ वखार केंद्रावर ११४ गोदामे असून साठवणूक क्षमता २.०३ मे. टन इतकी आहे.

शेतमाल उत्पादनाबरोबरच शेतमालाची सुरक्षित साठवणूक व त्याची विक्री व्यवस्थापन देखील महत्त्वाचे आहे. सुगीच्या हंगामात बाजारपेठेत शेतमालाची आवक जास्त होत असल्याने शेतकऱ्यांना कमी दरात शेतमालाची विक्री करावी लागते. अशावेळेस कृषी मालाच्या साठवणूकीस प्राधान्य देऊन महामंडळ राज्यातील सर्व ठिकाणच्या गोदामामध्ये या हंगामात नियोजन करीत आहे. महामंडळाच्या सर्व गोदामामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने शेती औद्योगिक मालाची साठवण केली जाते. ठेवीदारांना दिलेली महामंडळाची वखारपावती परक्राम्य लेख असल्याने ती बँकेकडे तारण ठेवल्यास ठेवीदारांना बँकेकडून त्वरीत कर्ज उपलब्ध होते. त्याआधारे, शेतकऱ्यांना हंगामात अर्थसहाय्य व नंतर बाजारभाव येईपर्यंत गोदामात साठवणुकीची सोय मिळते. शेतकऱ्यांनी चालू पिकाचा ७/१२ उतारा दिल्यानंतर वखार भाड्यात प्रचलित साठवणदरात ५० टक्के सवलत देऊन २५ टक्के जागा आरक्षित करण्यात येते. तसेच प्रत्येक पंधरवाड्यामध्ये कीड प्रतिबंधात्मक तसेच दर ३ महिन्यांनी उपचारात्मक कीटकनाशकांचा वापर करून माल सुरक्षित ठेवण्यात येतो. साठवणुकीस असलेल्या मालाला १०० टक्के विमा संरक्षण दिल्या जाते. त्यामुळे नुकसान झाल्यास योग्य ती भरपाई दिल्या जाते.

वखार महामंडळ व महाराष्ट्र सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने, शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्याकरीता अभिनव ऑनलाईन तारण कर्ज योजना राबविण्यात येते. याअंतर्गत, पात्र शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांना वखार पावतीवरील शेतमालाच्या किमतीचे ७० टक्के कर्ज बँकेकडून खात्यात जमा करण्यात येते. तारण कर्जाचा व्याजदर ९ टक्के असून इतर बँकेच्या तुलनेत सर्वात कमी आहे. कर्जाची मर्यादा १० लाख प्रती शेतकरी व ७५ लाख प्रती शेतकरी उत्पादक कंपनी इतकी आहे. महामंडळाच्या गोदामात साठवणुकीस ठेवण्यात येणाऱ्या शेतमालाच्या वखार पावतीवर ऑनलाईन तात्काळ कर्ज उपलब्ध होत असल्याने सबंधित शेतकरी, ठेवीदार यांच्या वेळेची बचत होऊन कागदपत्रासाठींच्या प्रवास खर्चात बदल होण्यास मदत होते. शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या सुविधांचा लाभ घ्यावा. सुगीच्या काळात व्यापाऱ्यांना माल न विकता तो वखार महामंडळाच्या गोदामात ठेवावा. असे आवाहन महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे विभाग प्रमुख सुभाष पुजारी यांनी केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos